Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे १० दिवस उरले आहेत. १८ तारखेला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यापूर्वी सर्वच नेते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील नागपूरमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. नुकतेच मतदारांशी बोलताना त्यांनी भावनिक आवाहन केले. “मागच्या २५ वर्षांपासून मी आमदार आहे. पण अजूनही माझे मुंबईत स्वतःचे घर नाही आणि मला नागपूरकर असल्याचा अभिमान आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २००९ पासून ते सलग निवडून येत आहेत.
v
“मी पंचवीस वर्ष विधानसभेत काम करत आहे, त्याच्यापूर्वी नगरसेवक आणि महापौर म्हणून काम केले. मात्र माझ्या या राजकीय वाटचालीत मी समाजासाठी काम करण्याचे एकमेव तत्व डोळ्यासमोर ठेवले. मी कधीच स्वतःचा विचार केला नाही. मी स्वत:चे घर भरण्याचा विचार केला नाही. मी स्वत:चा व्यवसाय किंवा शिक्षण संस्था उभी केली नाही. महाराष्ट्रात आजवर वीस मुख्यमंत्री झाले, या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत स्वतःचे घर नाही. आजही माझे घर नागपूरमध्येच आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे वाचा >> महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
देवेंद्र फडणवीस सध्या शासकीय बंगल्यात
देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ या काळात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना मुख्यमंत्री होते. तसेच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री ठरले. २०२२ साली महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. फडणवीस सध्या मुंबईत सागर या शासकीय बंगल्यात राहत आहेत. भाजपाने फडणवीस यांना पुन्हा एकदा नागपूर दक्षिण विधानसभेतून चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर
दरम्यान निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा आता राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीकडून मुख्यमंत्री आहेत. मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल हे निकालानंतरच कळू शकेल, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच म्हणाले आहेत. याआधी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे बोलले गेले होते. मात्र सांगलीमधील शिराळा येथे भाषण करताना अमित शाह यांनी महायुतीसह देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचे असल्याचे विधान केले. त्यामुळे भाजपाला अधिका जागा मिळाल्या आणि महायुतीचे सरकार आले तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमुख जबाबदारी येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.