लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : वकील असताना मी वरिष्ठ विधिज्ञांच्या मार्गदर्शनात सुवर्णकाळ अनुभवला. खूप काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आता न्यायमूर्ती झाल्यानंतर वरिष्ठ विधिज्ञांकडून बरेच काही शिकलो आणि सतत पुढे गेलो. नवोदित वकिलांनी वरिष्ठ वकिलांचे मार्गदर्शन घेऊन आणि त्यांच्या कामाचे निरीक्षण करून स्वत:ला विकसित केले पाहिजे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते शनिवारी, सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वरिष्ठ वकिलांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी न्यायमूर्ती गवई बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे तसेच हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल पांडे, सचिव अ‍ॅड. अमोल जलतारे उपस्थित होते.

आणखी वाचा-लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

न्या. गवई म्हणाले, संघटनेच्या निवडणुकीदरम्यान वकिलांमध्ये नेहमीच ताणतणाव होतात. परंतु, निवडणूक संपल्यावर सर्व सुरळीत होते. कोणीही आपल्या मनात राग धरून ठेवत नाही. त्यामुळे बारची प्रतिष्ठा आजही कायम आहे. मी वकील असताना नेहमी पूर्ण तयारीत राहायचो. अनेकदा विकेंडला ताडोबा, पेंच आणि मोगरकसा येथे जाऊन जंगल सफारीचा आनंद लुटत होतो, या सर्व आठवणी आता ताज्या झाल्या आहेत. याच न्यायालयात सुरु असलेल्या शेगावच्या विकासाच्या प्रकरणात तत्कालीन सरकारी वकील भारती डांगरे, दिपक ठाकरे आणि सर्वात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे न्यायालय मित्र अॅड. फिरदौस मिर्झा यांचे योगदान मोठे आहे. नागपूरमध्ये उच्च गुणवत्ताधारक वकील आहेत. ते प्रकरणाची संपूर्ण तयारी करून न्यायालयात हजर होतात. न्यायालयासोबत नेहमी प्रामाणिक राहतात. न्या. प्रसन्न वराळे म्हणाले, की नागपूरने मला आयुष्य समृद्ध करणारे अनुभव दिले. माझ्या यशामध्ये नागपूर बारच्या वरिष्ठ विधिज्ञांचे बहुमोल योगदान आहे. या महान बारचा इतिहास जतन करून ठेवणे आवश्यक आहे, असे न्या. गवई म्हणाले.

याप्रसंगी माजी न्यायमूर्ती वासंती नाईक, न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, माजी न्यायमूर्ती विजय डागा, वरिष्ठ वकील अ‍ॅड. श्रीहरी अणे, अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर, अ‍ॅड. आनंद जयस्वाल, अ‍ॅड. अनिल मार्डीकर, अ‍ॅड. अविनाश गुप्ता, अ‍ॅड. अरुण पाटील, अ‍ॅड. गौरी वेंकटरमण, अ‍ॅड. महेंद्रकुमार भांगडे, अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. अविनाश गोरडे, अ‍ॅड. सुनील मनोहर, अ‍ॅड. चंद्रशेखर कप्तान, अ‍ॅड. सुरेंद्रकुमार मिश्रा, अ‍ॅड. जुगलकिशोर गिल्डा, अ‍ॅड. मुकेश समर्थ, अ‍ॅड. रवींद्र खापरे यांचा सत्कार करण्यात आला. वरिष्ठ वकील अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर यांना त्यांच्या घरी सन्मानित करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I experienced a golden age in advocacy asserted justice bhushan gavai adk 83 mrj