अमरावती : माझी कधीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. हेच मी गृहमंत्री अमित शहा यांना सांगितले होते. मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, मी पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे. माझ्यासमोर प्रश्न आहे, तो देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचा. देशात आणीबाणीनंतर विरोधी पक्षांना बोलण्याची संधी तरी दिली गेली होती. जनता पक्ष आणि अनेक समविचारी नेते मैदानात उतरले होते, आता तीदेखील मुभा राहिलेली नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात विरोधी पक्षांची एकजूट सुरू आहे. खरे तर मी त्यांना विरोधी पक्ष मानण्यास तयार नाही. ही देशप्रेमी लोकांची एकता आहे. त्याला सरकार घाबरलेले आहे. पूर्वी सरकार मतपेटीतून तयार व्हायचे, आता खोक्यातून व्हायला लागले आहे. कुणीही दमदाटी करून पक्ष चोरण्याचा प्रयत्न करतो. हा पायंडा आता पडला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जनतेला ‘राईट टू रिकॉल’चा अधिकार मिळाला पाहिजे, असे माझे मत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील हा विचार बोलून दाखवला होता. एखादा पक्ष सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करीत नसेल, जनतेला पसंत नसेल, तर त्या पक्षाला सत्तेवरून खेचण्याचा अधिकार लोकांना हवा.

हेही वाचा – चंद्रपुरात ‘एक सही संतापाची’, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अनोखा उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विद्यमान सरकारला नपुंसक सरकार, असे संबोधले होते, आता ते सरकारमध्ये का गेले, असे विचारले असता “मला माहित नाही, ते तिकडे का गेले, कदाचित ताकद वाढवायला गेले असतील,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I never wanted to be cm said uddhav thackeray while talking to reporters in amravati mma 73 ssb