राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरूद्ध आपण अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. नवाब मलिक यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून राज्य सरकारवर अविश्वास दाखवला असल्याची टीकाही त्यांनी केली.
दिवाळीच्या काळात राज्य सरकारने जप्त केलेली दोन हजार कोटी रुपये किमतीची तूरडाळ रेशनवर उपलब्ध न करता व्यापाऱ्यांना परत करताना गैरव्यवहार झाला असून, गिरीश बापट यांनी २०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी गुरुवारी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळले. ते म्हणाले, नवाब मलिक यांनी आरोप करताना चुकीची माहिती दिलेली आहे. किती डाळीचा पुरवठा करण्यात आला, याची योग्य माहिती त्यांनी घेतलेली नाही. त्यांनी राज्य सरकारवर अविश्वास व्यक्त करतानाच माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्यामुळेच आपण त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहोत.

Story img Loader