वर्धा: शासनाच्या सेवेत असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची त्यांच्या कार्यशैली मुळे नेहमी चर्चा झडत असते. काही आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांनी तर काही वादग्रस्त निर्णयानी चर्चेत येतात. एक आणखी वर्ग आहे. ज्याची सतत बदली होते, असे पण अधिकारी महाराष्ट्रास परिचित आहेत. आता एका नावाची भर पडली. ते म्हणजे राहूल कर्डीले. मंगळवारी त्यांची बदली नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतांना त्यांची बदली झाली होती.
वर्धा जिल्हाधिकारी असतांना त्यांना नाशिक महानगर पालिका आयुक्त म्हणून बदलीवर पाठविण्यात आले. पण २४ तासातच या बदलीस स्थगिती देण्यात आली होती. नाशिक येथे होणाऱ्या संभाव्य कुंभ मेळा हे त्यामागचे कारण असल्याची चर्चा झाली. राज्याच्या एका वजनदार मंत्र्यांच्या हस्ताक्षेपमुळे ही स्थगिती ओढविल्याचे म्हटल्या गेले. स्थगिती उठली. त्यांना मुंबईत सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि १५ दिवस लोटत नाही तोच कर्डीले नांदेडचे जिल्हाधिकारी झाले आहे.
अश्या या तीन बदल्या कर्डीले यांनी एका महिन्यात झेलल्या. एक प्रामाणिक व कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांचा बोलबाला राहला. वर्ध्यात जिल्हाधिकारी असतांना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करतांना काही बाबी नमूद केल्या होत्या. ते म्हणाले की त्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि मामांनी त्यांना शिकायला गावी नेले होते. काही अंतराची पायपीट करीत ते गावातील शाळेत शिकले. दहावीपर्यंत खेड्यातील शाळेत शिक्षण व मग बाराविनंतर विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी. मित्र थोडे टिवल्या बावल्या करणारे म्हणून पदवीस साडे पाच वर्ष लागली. मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न म्हणून त्यासाठी दिल्लीत क्लास लावायचा. आईने मग राहते घर विकले. त्याचा नैतिक दबाव म्हणून कठोर परिश्रम घेतले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश आले. जिल्हा उपनिबंधक म्हणून निवड झाली. तिथेच पत्नी प्रियंका सोबत भेट झाली. लग्न झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची एक संधी बाकी होती. पत्नीने हे संधी घेऊन टाकण्यास सुचविले. यश आले. शेवटच्या संधीत सनदी अधिकारी म्हणून निवड झाली, असे ते म्हणाले. २०१५ च्या बॅचचे अधिकारी असलेले कर्डीले यांनी नंतर विविध पदे भूषविली. वर्ध्यात जिल्हाधिकारी असतांना त्यांनी राबविलेले विविध उपक्रम प्रशस्तीस पात्र ठरले. त्यात निवडणूक विषयक उत्कृष्ट कार्य केले म्हणून राज्य शासनाने त्यांचा उत्कृष्ट निवडणूक अधिकारी म्हणून गौरव केला होता.
लोकसत्ताच्या तरुण तेजांकीत पुरस्काराचे पण ते मानकरी ठरले. त्यांच्याच काळात वर्ध्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. मराठी साहित्यावर प्रेम असलेल्या व अनेक पुस्तकांचे वाचन केलेल्या कर्डीले यांनी हे साहित्य संमेलन घरचे लग्नकार्य म्हणून डोळ्यात तेल घालून यशस्वी करण्यास मोठा हातभार लावल्याचे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते सांगतात. वर्ध्यातून त्यांची बदली झाली तेव्हा वर्धेकरांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला होता. सामान्य नागरिकांचा स्नेह प्राप्त करणारे अधिकारी, अशी त्यांची ओळख. आज म्हणूनच त्यांच्या बदल्या बाबत चर्चा होत आहे.