यवतमाळ : केंद्रीय गुप्तचर तपास यंत्रणेने (आयबी) जिल्ह्यात कारवाई करत जम्मू काश्मीर पासिंगचा एक ट्रक जप्त करून दोन तरुणांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पाटणबोरी (ता. पांढरकवडा) येथे ही कारवाई करण्यात आली. आयबीच्या अधिकाऱ्यांनी हा ट्रक पाटणबोरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ट्रकची ‘इनकॅमेरा’ तपासणी सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >>> ‘रेल्वे रोको’पूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात, बुलढाणा पोलिसांची राजूर घाटात कारवाई; ठाण्यासमोर तणावसदृश्य स्थिती
पांढरकवडा तालुक्यातून जम्मू-काश्मीरकडे एक ट्रक जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नागपूर येथील केंद्रीय गुप्तचर विभागाचे पथक यवतमाळ येथे पोहोचले. यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांना पथकातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. डॉ. बन्सोड यांनी तातडीने यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आयबीच्या मदतीसाठी दिले. त्यानंतर पाटणबोरीजवळ आयबी आणि यवतमाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने हा संशयित ट्रक अडविला. ताब्यात घेण्यात आलेला ट्रक जम्मू-काश्मीर पासिंगचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुप्तचर यंत्रणेच्या या कारवाईचा दहशतवादी घटनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची कसून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात तपास अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पोलीस अधीक्षक डॉ. बन्सोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.