लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: उन्हाळा सुरू होताच शहरात उसाचा रस, लिंबू सरबत, कैरी पन्हे, ताक, मठ्ठा, लस्सीची अनेक दुकाने रस्त्यावर थाटली जातात. या शीतपेयात विक्रेते बर्फ टाकतात. मात्र तो शुद्ध पाण्यापासून तयार केलेला असतो का, हे कुणीच तपासत नाही.

चौका-चौकात उसाच्या रसाच्या गाड्या लागलेल्या दिसतात. हे सर्व विक्रेते बर्फमिश्रित शीतपेय ग्राहकांना देतात. मात्र त्यांच्याकडे असलेला बर्फ अनेकदा आरोग्यास अपायकारक असतो, तो शुद्ध पाण्यापासून तयार केलेला नसतो.

शहरात अनेक ठिकाणी बर्फाच्या लाद्या विक्रीसाठी रस्त्यावर ठेवलेल्या दिसतात. सक्करदारा चौक, मंगळवारी बाजार, तुकडोजी चौकात विक्री केली जाते. बर्फ कापडाने झाकलेला असला तरी त्याच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असतो.

आणखी वाचा-Video: कामगाराच्या अंगावर वीज कोसळतानाची थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

तेथूनच विक्रेते बर्फ खरेदी करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बर्फासाठी वापरण्यात आलेले पाणी शुद्ध किंवा पिण्यायोग्य नसते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे बर्फविक्रेते बिनधास्त सामान्यांच्या आरोग्याशी खेळताना दिसत आहेत.

नियमानुसार विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. विनापरवाना व्यवसाय केल्यास कारवाई करण्यात येते. अशा विक्रेत्यांना सहा महिने शिक्षा आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र संबंधित विभाग पदपथावर शीतपेयाची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करीत नाही. त्यामुळे त्याचे फावत आहे.

“अशुद्ध पाण्यापासून तयार करण्यात आलेला बर्फ आरोग्यासाठी घातक आहे. अशा बर्फाचा वापर केल्यास पोटाचे विकार आणि अन्य संसर्ग होऊ शकतो. निकृष्ट बर्फामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.” -डॉ. अमर मोंढे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ice in soft drinks harmful to health adk 83 mrj
Show comments