लोकसत्ता टीम
गोंदिया : गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर आता वेध लागलेत ते नवरात्रोत्सवाचे, गणपती बाप्पाची मूर्ती घडविल्यानंतर एक दोन दिवसांची उसंत घेतलेल्या मूर्तिकारांनी आदिशक्तीच्या मूर्ती घडवण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
एका आठवड्या नंतर येत्या १५ ऑक्टोबरला नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांकडे अगदी मोजकेच काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मात्र, गणरायाप्रमाणेच यंदा आदिशक्तीच्या मूर्तीचे दरही गेल्या एका वर्षात झपाट्याने वाढलेल्या महागाई मुळे २५ ते ३० टक्क्यांनी वधारले असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-१७८ कृषी वाहिन्यांचे विलगीकरण होणार, गुणवत्तेनुसार कामासाठी…
आदिशक्तीच्या स्वागतासाठी गोंदियाकर सज्ज झाले असताना येथील चितारओली, कुंभारवाडेही मूर्ती घडविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. सध्या मूर्ती घडवण्याचे काम दुसऱ्या टप्प्यात आले आहे. मूर्तीकारांकडून रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कुंभारवाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा माता, भवानी माता, महिषासूरमर्दिनी, रेणुका, सिन्हसवारणी, वैष्णव देवी अशी देवीचे विविध रुपे मूर्तिकारांनी साकारली आहेत.
आणखी वाचा-Video: सावधान! वाघ फेरफटका मारतोय…
गणेशोत्सवानंतर फार कमी अवधीत देवीच्या मूर्ती घडवायच्या असतात. देवी हे स्त्री रूप असल्याने डोळे, चेहरा, हास्य आदी कामे फारच निक्षुणपणे करावी लागत असून नवरात्रोत्सव मंडळाकडून आधीच बुकिंग करण्यात येते. यंदा कच्च्या मालाचे व मूर्तीसाठी लागणारे सजावट, कापड, श्रृंगार साहित्याचे दर वाढले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ३० ते ३५ हजार रुपये पर्यंत तयार होणारी मूर्ती या वर्षी ४० ते ४५ आणि ५० हजारापर्यंत तयार होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देवीच्या मूर्तीचे दरही ५ ते १० हजार रुपये पर्यंत वाढले असल्याचे गोंदिया शहरात कोलकाता जवळील एका गावातून आलेले मूर्तिकार कृष्णा मंडल यांनी सांगितले.