चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून जनतेच्या समस्या निवारणाकरिता आंदोलने, मोर्चा, सत्याग्रह, उपोषण करण्यात येते. या कार्यक्रमांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र, पदाधिकारीच या कार्यक्रमाला दांडी मारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लक्षात येताच त्यांनी आभासी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. संघटनात्मक पद असलेल्या पदाधिकाऱ्याने किमान दहा कार्यकर्त्यांसह मोर्चात सहभागी असणे आवश्यक आहे. अन्यथा सहभागी न झालेल्या पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून दुसऱ्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
देशासह राज्याच्या समस्यांबाबत काँग्रेसने वेळोवेळी अनेक आंदोलने, मोर्चा व यात्रा काढल्या. यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारीच सहभागी होत नसल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी न झाल्याने केवळ कर्तव्य म्हणून आंदोलने करण्यात आली. जिल्हास्तरावर पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्वतः सहभागी होत आपल्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना सहभागी करणे अपेक्षित होते. मात्र, अनेक पदाधिकारी आंदोलन, मोर्चात सहभागी होत नसल्याचे प्रदेश काँग्रेसच्या लक्षात आले आहे. हा प्रकार चिंताजनक असल्याने पटोले यांनी २६ मार्चच्या झूम मीटिंगमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. अपवादात्मक परिस्थिती वगळता पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारी पार पाडणे, त्याचे उचित पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रदेश, जिल्हा व ब्लॉक स्तरावरील अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेऊनही पक्षाचे काम करत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देता येईल. पक्षाच्या कार्यक्रमात वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती जिल्हाध्यक्षांनी तातडीने प्रदेश कार्यालयाकडे पाठवावी, असे स्पष्ट निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जारी केले आहे. तसेच पत्र काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिले आहे.
हेही वाचा… फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; एक मजूर ठार, हादऱ्यामुळे भिंत कोसळली
कार्यक्रमाबाबत अवगत करण्याची जबाबदारी जिल्हा काँग्रेस समितीचीच
काँग्रेसच्या देश व प्रदेश स्तरावरून दिलेल्या कार्यक्रमाची माहिती सर्व नेते, आजी माजी खासदार, आमदार, प्रदेश, जिल्हा व ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी, आघाडी संघटना- विभाग व सेलचे पदाधिकारी यांच्यासह सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देण्याची जबाबदारी जिल्हा काँग्रेस समितीने घ्यावी. प्रदेश स्तरावरून आलेल्या कार्यक्रमाबाबत सर्वांना अवगत करण्यात यावे.
हेही वाचा… नागपूर: गडकरींना धमकी देणाऱ्या पुजारीच्या मुसक्या आवळल्या; आज नागपुरातील न्यायालयात करणार हजर
पदाधिकाऱ्यांनी किमान ४० कार्यकर्ते सोबत आणावे
यापुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात अथवा मोर्चात प्रदेश पदाधिकाऱ्यांनी किमान ४० कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी २० तर ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी यांनी १० कार्यकर्ते सोबत आणणे बंधनकारक आहे. जे पदाधिकारी दिलेल्या उद्दिष्टानुसार आपल्यासोबत कार्यकर्ते आणणार नाहीत अशांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने पाठवण्यात यावी. अशा पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून दुसरे पदाधिकारी नेमण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.