लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : राज्यातील सत्ताधारी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलवत आहेत. सत्ताधाऱ्यांचे केवळ वेळकाढू धोरण असून एकदा निवडणुका झाल्यावर हे आंदोलन देखील चिरडण्यात येईल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासह राजकीय भूमिका देखील घेतली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे दिला. जरांगे पाटील लोकसभेत पोहोचल्यास त्या ठिकाणी आवाज उठवून आरक्षण मिळवू शकतील, असे देखील ते म्हणाले.

अकोल्यात शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सत्ताधाऱ्यांच्या वतीने आ.बच्चू कडू यांना मध्यस्थीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्यात आले. मात्र, तोडगा निघू शकला नाही. मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने सरकारचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी. त्यांनी केवळ पाठिंबा देण्यापुरतेस मर्यादित न राहता निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. ते सहज लोकसभेत पोहोचू शकतील. मराठा आरक्षणासाठी आंदोलनासोबतच त्यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे. याचा गांभीर्याने विचार त्यांनी करायला हवा.”

आणखी वाचा-चंद्रपूर : इरई धरण परिसरात परदेशी पाहुण्यांचे आगमन

श्रीमंत मराठा व गरीब मराठा अशी दरी असून गरीब मराठ्यांचे नेतृत्व उभे राहू दिल्या जात नाही. मनोज जरांगे पाटील समोर आले आहेत. त्यांच्या मागे गरीब मराठ्यांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. ओबीसी समाजाच्या नोंदीची सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी फसवी आहे. भाजपकडून दंगलीचा अजेंडा पुढे रेटला जात आहे. ओबीसींना उचकवून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, विभागीय अध्यक्ष बालमुकुंद भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, गजानन गवई आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला वंचित आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यांनी राजकीय भूमिका जाहीर केल्यास त्या संदर्भात देखील पाठिंबा देण्याचा विचार करू, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-मोकाट श्वान आडवा आला अन् शालेय विद्यार्थी घेऊन जाणारी रिक्षा उलटली

…तर काँग्रेस यात्रा रद्द करणार का?

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली. लोकसभा निवडणूक केव्हा ही जाहीर होण्याची शक्यता असून निवडणुका जाहीर झाल्यास काँग्रेस यात्रा रद्द करणार का? असा सवाल ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. दोन्ही एकत्रित होऊ शकत नाहीत, असे देखील ते म्हणाले. इंडिया आघाडीत समावेश होण्याच्या मुद्द्यावर वर्षभरापूर्वी होती, तीच स्थिती आजही कायम आहे. नरेंद्र मोदींविरोधात एकत्र येण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत वाट पाहणार आहोत, असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.