लोकसत्ता टीम
यवतमाळ : ‘मराठा आरक्षणाबाबत जी व्यक्ती विधानसभेत आवाज उचलण्याची ग्वाही देईल, त्याच उमेदवाराला आपण पाठिंबा जाहीर करणार’, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात प्रथम यवतमाळ येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच संभाव्य उमेदवार बिपीन चौधरी यांनी शपथपत्रावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अखेरपर्यंत लढा देण्याचे वचन दिले.
बिपीन चौधरी हे यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी पाचशे रुपयांच्या मुद्रांक पत्रावर प्रतिज्ञापत्र जाहीर केले आहे. या शपथपत्रात त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देण्याचा तसेच त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे वचन दिले आहे. या प्रतिज्ञापत्रानंतर मनोज जरांगे आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा-‘नो राईट टर्न’: वाहतुकीच्या नव्या प्रयोगावर नागपुरकरांची प्रतिक्रिया, हा तर ‘नाकापेक्षा मोती जड’!
राज्यात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाजाने महायुतीच्या उमेदवारांविरुध्द मतदान केले. यामुळे महायुतीच्या अनेक उमेदवारांना त्याचा फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीतसुध्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उचलण्याची ग्वाही देणाऱ्या उमेदवारास आपण पाठिंबा जाहीर करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे यवतमाळचे बिपीन चौधरी यांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून देत मराठा समाजाचा आवाज बुलंद करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यापूर्वी मराठा आरक्षणाकरीता झालेल्या अनेक आंदोलनांत आपला सहभाग असल्याचा उल्लेख बिपीन चौधरी यांनी शपथपत्रात केला आहे. मराठा समाजाला धोका दिल्यास समाजाने आपल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असेही बिपीन चौधरी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. बिपीन चौधरी यांच्या या प्रतिज्ञापत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यवतमाळ हा कुणबी, मराठाबहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे या समजाच्या नजराही मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
आणखी वाचा-निवडणुकीच्या तोंडावर संघप्रणीत संघटना सरकारवर संतापली, भाजपला टेंशन…
बच्चू कडू आज यवतमाळात
राज्यात महायुती, महाविकास आघाडी तसेच तिसरी आघाडीसुध्दा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. तिसऱ्या आघाडीचे प्रमुख नेते बच्चु कडू हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी दुपारी यवतमाळ येथे येत आहेत. यावेळी तिसऱ्या आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बिपीन चौधरी यांनी सांगितले.