नागपूर : दर निव़डणुकीत निरुत्साह दाखविणाऱ्या नागपूरकरांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची सुरूवात अतिशय उत्साहपूर्ण केली. काही अपवाद वगळता नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात मतदान केंद्रात रांगा बघायला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत नागपूर जिल्हा प्रशासनाने ७५ टक्के मतदानाचे लक्ष्य ठेवले होते. मात्र नागपूरमध्ये साठ टक्क्याच्या आसपासच मतदान झाले. आता विधानसभा निवडणुकीसाठीही जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा ७५ टक्के मतदानाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागपूरकरांचा सकाळचा मतदानाचा उत्साह दिवसभर असाच कायम राहिला तर हे लक्ष्य गाठणे कठीण होणार नाही.
पूर्व नागपूरची आघाडी
निवडणुक आयोगाद्वारे सकाळी ११ वाजतापर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार मतदानात पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाने आघाडी घेतली. पूर्व नागपूरमध्ये २०.५३ टक्के मतदान झाले. यानंतर २०.२१ टक्क्यांसह दक्षिण नागपूर दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे. दक्षिण-पश्चिममध्ये सकाळी ११ पर्यंत १९.९१ टक्के मतदान पार पडले. शहराच्या अंतर्गत सर्वात कमी मतदान मध्य नागपूर आणि उत्तर नागपूरमध्ये झाले असल्याची माहिती आहे. मध्य नागपूरमध्ये सुमारे १५ टक्के मतदारांनी मत केले. उत्तर नागपूरमध्ये १६.३८ टक्के मतदान पार पडले.
ग्रामीणमध्ये अधिक उत्साह
नागपूर शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमध्ये मतदारांमध्ये अधिक उत्साह बघायला मिळाला. उमरेडमध्ये सर्वाधिक २३ टक्के मतदान पार पडले. नागपूर ग्रामीणच्या सावनेर, रामटेक आणि कामठी मतदारसंघात प्रत्येकी २० टक्के मतदान झाले. नागपूर ग्रामीणमध्ये सर्वात कमी मतदान हिंगणा मतदारसंघात झाले आहे. हिंगणामध्ये केवळ १७ टक्के मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला.