लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : परिवहन खाते हेल्मेट सक्तीसह अपघात नियंत्रणाची मोहीम राज्यभर राबवणार आहे. त्यात १८ वर्षांहून कमी वयाची मुले ५० ‘सीसी’हून जास्त क्षमतेची दुचाकी चालवताना आढळल्यास त्यांना २५ वर्षे वाहन चालवण्याचा परवानाच मिळणार नाही. केंद्रीय मोटार वाहन कायद्यात ही तरतूद आहे. त्याआधारे ही कारवाई केली जाणार आहे.

देशात दरवर्षी अपघातात दीड लाख व्यक्ती तर राज्यात सुमारे १५ हजार व्यक्ती जीव गमावतात. त्यात अनेकांना कायमचे अपंगत्वही येते. परिवहन खात्याच्या अहवालानुसार, जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान झालेल्या एकूण अपघातांमध्ये ५१ टक्क्यांहून अधिक अपघात दुचाकी चालकांचे आहेत. त्यात ७ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला. अनेक अपघातात हेल्मेट घालण्यात आले नव्हते, असे दिसून आले आहे.

आणखी वाचा-मेळघाटातील बालमृत्यूच्या ‘त्या’ घटनेचा संदर्भ देत गडकरींनी सांगितला किस्सा

जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत ५० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार परिवहन खाते राज्यभरात आता हेल्मेट सस्तीसह दुचाकी तपासणी व समुपदेशन मोहीम राबवणार आहे. त्यात १८ वर्षांखालील मुलांनी ५० ‘सीसी’हून जास्त क्षमतेची वाहने चालवल्यास त्यांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना प्रतिबंधित केला जाईल. १६ वर्षानंतर मुलांना ५० ‘सीसी’च्या खालील वाहने चालवता येतात. परंतु, त्यासाठी परवाना आवश्यक असतो. मोटार सायकल विक्रेत्यांना आता ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. ग्राहकांना दोन हेल्मेट न देणाऱ्यांवरही आता कारवाई केली जाणार आहे.

राज्यात अपघात कमी करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आणि वरिष्ठांनी हेल्मेट सक्तीसह इतर तपासणी मोहिमेला गती देण्याची सूचना केली आहे. त्यात अठरा वर्षांहून कमी वयाची मुले वा मुली ५० ‘सीसी’हून जास्त क्षमतेची दुचाकी चालवताना आढळल्यास त्यांना २५ वर्षांपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही. -रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If ride a bike at a young age you dont get driving license until the age of twenty five mnb 82 mrj