लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अंबाझरी तलावाजवळून पुढे शंकरनगर, रामदासपेठ, बर्डीकडे वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात पक्के बांधकाम, काँक्रिटचा मलबा आणि तत्सम प्रकारचे अडथळे आल्याने पाणी शेजारच्या वस्त्यांमध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या अतिवृष्टीमुळे शहरातील प्रमुख नाले दुथडी भरून वाहू लागले. अंबाझरी तलावाजवळून वाहणाऱ्या नाल्यात तलावाचे पाणी शिरल्याने पूर आला. हा नाला गांधीनगर, शंकरनगर, रामदासपेठ, बर्डी व पुढे जातो. या नाल्याच्या पुराचे पाणी अंबाझरी लेआऊट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगर, सेंट्रल मॉल आणि लगतच्या वस्त्यांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाल्यावर अनेक ठिकाणी पक्के बांधकाम करण्यात आले आहे. अनेक जण येथे कचरा टाकतात.

आणखी वाचा-“सत्तेसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी राज्यात पेपरफुटी”, विजय वडेट्टीवार यांचा आरोप; म्हणाले…

शंकरनगरजवळील नाल्यालगत एका शाळेची भिंत काही दिवसांपूर्वीच कोसळली होती व तिचा मलबाही नाल्यातच पडला होता. तोही काढण्यात आला नव्हता. नाल्याला पूर आला तेव्हा वेगाने येणारे पाणी पुढे जाण्याऐवजी मार्गातील अडथळ्यांना अडून आजूबाजूंच्या वस्त्यांमध्ये शिरले.

नाल्यातील पक्के बांधकाम तोडले असते व त्यातील मलबा, कचरा योग्य पद्धतीने यापूर्वीच काढला असता तर पाण्याचा प्रवाह न अडता सरळ गेला असता व वस्त्यांना फटका बसला नसता. वहन क्षमतेपेक्षा अधिक पाणी नाल्यात आल्याने समस्या उद्भवल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याच्या वेळी सांगितले होते. पुरापासून धडा घेत नव्याने उपाययोजना करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the obstructions in the drains were attended to in time nagpur cwb 76 mrj
Show comments