अमरावती : आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे, असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी साद घातली. राज ठाकरेंच्या या टाळीवर आता उद्धव ठाकरेंनीही हाळी दिली आहे. मात्र, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यावर भाष्य केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. कुठल्या पक्षासोबत युती करायची किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार हा संबंधित पक्षाच्या प्रमुखांना असतोच. राज ठाकरे यांना जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती करावी, असे वाटत असेल, तर भाजपला त्यांच्यात युतीच्या मध्ये येण्याचे कुठलेही कारण नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला त्याच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो, आम्ही त्याविषयी आक्षेप घेण्याचे कारण नाही. राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका घ्यावी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अत्यंत चांगला निर्णय त्यावेळी राज ठाकरे यांनी घेतला. नरेंद्र मोदी यांनी जगातील सवोत्तम देश म्हणून भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. संपूर्ण जगभरात भारताची उंची टिकविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन भारत देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही प्रयत्न सुरूच आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे हे सोबत होते, पण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजप किंवा महायुतीसोबत राहण्यास नापसंती दर्शवली. त्यावेळी त्यांनी तसा निर्णय घेतला. आता कोणता निर्णय घ्यायचा, हा राज ठाकरे यांचा अधिकार आहे. त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी राज ठाकरे यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती पूर्ण केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले. मराठी भाषेसाठी आम्ही सर्व जण जिवाचे रान करणारे लोक आहोत.