बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी, ‘यापुढे कोणीही संजय राठोड यांच्याविरोधात अनावश्यक टीका केल्यास, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ’, अशा शब्दात इशारा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर संजय राठोड यांच्याविरोधात युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपावरून टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी १४ ऑगस्टला पोहरादेवी (जि. वाशीम) येथे बंजारा समाजाची धर्म परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर महंत सुनील महाराज यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या धर्म परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश मंत्री संजय राठोड यांनाही देण्यात आल्याचे सुनील महाराज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. पोहरादेवी येथे धर्मगुरू व महंतांच्या उपस्थितीत होत असलेल्या या धर्म परिषदेस बंजारा समाजातील नायक, कारभारी, डाव आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संजय राठोड हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याने, ही परिषद राजकीय शक्तिप्रदर्शन असल्याचेही सांगण्यात येत आहे. या परिषदेत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीवर मंथन करण्यात येणार आहे. समाजातील संजय राठोड यांची मंत्रीपदी नियुक्ती होताच विरोधक पोलिसांनी ‘क्लीन चिट’ दिलेल्या एका प्रकरणाशी संबंध जोडून त्यांच्यावर टीका करत आहे. या दृष्टीने बंजारा समाजाची ठोस राजकीय भूमिका या धर्म परिषदेत ठरवली जाणार आहे. या परिषदेस धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितू महाराज, महंत सुनील महाराज, महंत शेखर महाराज, महंत यशवंत महाराज यांच्यासह बंजारा समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर संजय राठोड यांचे उद्या शनिवार, १३ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी त्यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी केली आहे. राठोड हे नागपूरहून कळंब येथे सकाळी ११ वाजता पोहचणार आहेत. तेथे स्वागत व चिंतामणी मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर ते दुपारी १२ वाजता यवतमाळला पोहचणार आहेत. येथे आगमन झाल्यानंतर स्थानिक शनिमंदिर चौकात त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर अभ्यंकर कन्या शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.