लोकसत्ता टीम
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, नागपूरमध्ये गडकरी विविध ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेऊ लागले. विरोधी पक्षांकडून भाजपवर होणाऱ्या आरोपांना प्रतिउत्तर देऊ लागले. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास देशाचे संविधान बदलणार असा आरोप भाजपवर नेहमी केला जातो, उत्तर नागपूर या राखीव विधानसभा मतदार संघात घेतलेल्या मेळाव्यात वरील आरोपाला उत्तर दिले.
टेका नाका येथील प्रल्हाद लॉनवर उत्तर नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलन झाले. त्यात बोलताना गडकरी म्हणाले “जात-पात, धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे संस्कार आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाच्या कल्याणासाठी, त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत भरपूर कामे केली.
आणखी वाचा- खराब हवामानामुळे विमान वाहतूक कोलमडली, विमाने इतरत्र वळवली
संविधानाबाबत काय म्हणाले गडकरी
गडकरी म्हणाले, ‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार असल्याचा आरोप होतो. पण संविधान बदलण्याचे प्रयत्न काँग्रेसच्याच काळात सर्वाधिक वेळा झालेत. आपल्याबद्दलचा अपप्रचार काँग्रेस करीत आहे. आम्ही, संविधानाच्या विरोधात असतो तर दीक्षाभूमीचा एवढा विकास झाला नसता. आजही विकास कामे सुरू आहेत.. हजारो रुग्णांच्या हृदयविकार शस्त्रक्रिया केल्या, कित्येकांना कृत्रिम अवयव लावून दिलेत. दिव्यांगांसाठी पार्क तयार केला आहे. ही कामे करताना कधीही जात-पात-धर्माचा विचार केला नाही.’ मी गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान मानतो. समता हा माझा जीवन मंत्र आहे. मंत्री झाल्यावर मी २२ हजार कोटी रुपयांचे बुद्ध सर्किटचे काम केली.