नागपूर : चहा पिल्याने तरतरी येते, थकवा किंवा आळस दूर पळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी मिळाली नाही तर काही करण्याचा उत्साहच रहात नाही, असे चहावेडे पुरुष, महिला बोलून दाखवतात. मात्र, एका नव्या संशोधनातून अशी बाब पुढे आली आहे की, चहाचा घोट ओठाला लावण्यापूर्वी तुम्ही एक वेळ तरी असा विचार कराल की, ‘चहा, नको रे बाबा..’
विपुल केशसंभार महिलांच्या सौंदर्यात ‘चार चांद’ लावतो. तरुणांसह पुरुषांनाही मानेपर्यंत रुळणारे केस, हलक्या हवेनेही उडणारे, भुरभुरणारे केस आवडतात. डोळ्यांवर येणारी केसांची बट हळूच सावरणारी षोडशवर्षीय तरुणी असो की महिला किंवा गरज नसतानाही केसांशी खेळणारे युवक, पुरुष असो, इतरांचे लक्ष त्यांच्याकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी होतात. मात्र, एकदा का केस गळायला सुरवात झाली की मग होणारे विरळ केस व टकलाचे विचार येऊन ताण तणाव वाढायला सुरवात होते. या केसगळतीला जास्त प्रमाणात घेतला जाणारा चहा कारणीभूत आहे, असे एक संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
हेही वाचा – नर्मदेच्या पुरात नागपूरच्या डॉक्टरसह पाचजण अडकले, नितीन गडकरींनी केली मदत
चीनमध्ये याविषयी संशोधन केले जात आहे. बीजिंग येथील एका विद्यापीठाच्या तज्ज्ञांना असे आढळून आले की, जे पुरुष एनर्जी ड्रिंक्स, कॉफी आणि चहा जास्त प्रमाणात पितात त्यांच्यामध्ये केस गळण्याचे प्रमाण ३० टक्के अधिक असते. सोडा आणि तत्सम उत्साहवर्धक पेय पिल्यामुळेही केसांवर प्रतिकूल परिणाम होतो.
न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये केसगळतीबाबत संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ज्या व्यक्ती दिवसभरात गोड पेयांचे जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांना इतरांच्या तुलनेत केसगळतीच्या समस्येचा जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गोड, उत्साहवर्धक पेय न पिणाऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात घेणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण ४० ते ४५ टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळले आहे. केसगळतीची तक्रार करणारे आठवड्यात १ ते ५ लिटरपर्यंत गोड पेय रिचवत होते. एक हजारांहून जास्त नागरिकांमध्ये केसगळतीबाबत चार महिने अभ्यास करण्यात आला. यासाठी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या खानपान सवयी, त्यांचे मानसिक आरोग्य व इतर घटकांचाही अभ्यास करण्यात आला आहे.
हेही वाचा – गणरायाच्या आगमनासह कोसळणार पावसाच्या सरी
आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर गरजेचा आहे. ‘क’ जीवनसत्व असणारी फळे व प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्सयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करावे. फास्ट फूड शक्यतो टाळा. व्यायामासह झोप व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्या. चिंता, ताण तणाव टाळून सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करावा. केसांसंबंधी समस्या आढळल्यास वेळीच तज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. – डॉ. ए. के. पाल, नागपूर