लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: ‘समृद्धी’ महामार्गावर प्रवेशानंतर गंतव्यावर वाहन वेळेआधी पोहचल्यास द्वारावरील फाटक उघडणार नाही. म. रा. रस्ते विकास महामंडळ मर्यादितच्या (एमएसआरडीसी) स्वयंचलित यंत्रणेमुळे हे घडणार आहे. सोबतच अतिवेगाने वाहन चालल्याने दंड आणि चालकाला सक्तीने समुपदेशन केले जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली.

नागपुरातील आरटीओ कार्यालयात शनिवारी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी लोकसत्ताशी बोलताना भिमनवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर एकूण नऊशेहून अधिक लहान- मोठे अपघात झाले. त्यापैकी २२ प्राणांकित अपघातात ४० जणांचा मृत्यू झाला. यातील २२.७२ टक्के अपघात टायर फुटून, २७.२७ टक्के अपघात पुढच्या वाहनाला धडक देऊन, १८.१८ टक्के अपघात चालकाला डुलकी आल्याने झाले.

आणखी वाचा- देशात अपंगांशी संबंधित शिक्षण, प्रशिक्षणाची माहिती लवकरच एका ‘क्लिक’वर

अतिवेगाने वाहन चालवून ९.०९ टक्के आणि इतरही कारणाने प्राणांकित अपघात नोंदवले गेले. अपघातावर नियंत्रणासाठी परिवहन खात्याने बरेच उपाय केले. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसत आहे. मार्च २०२३ मध्ये येथे १७ प्राणांकित अपघात झाले. त्या तुलनेत एप्रिल २०२३ मध्ये ९ प्राणांकित अपघात झाले. अपघाताचे प्रमाण आणखी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी परिवहन खात्याने आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (एमएसआरडीसी)च्या स्वयंचलित वाहन निरीक्षण प्रणालीची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार एखाद्या पथनाक्यावर वाहनाने समृद्धीचा प्रवास सुरू केल्यास ते इतर ठिकाणी किती वेळात पोहोचले, ते बघितले जाईल.

या मार्गावर कारची वेग मर्यादा १२० किमी प्रति तास, ट्रकची ८०, बसची १००, टँकरची ६० किमी प्रतितास निश्चित आहे. या वेगाहून कमी वेळात हे वाहन गंतव्यावर पोहचल्यास ते अतिवेगाने धावल्याचे स्पष्ट होईल व येथील पथनाक्याच्या द्वारावरील फाटक उघडणार नाही. येथे विशिष्ट सायरन वाजून अधिकाऱ्यांना सूचना दिली जाईल. त्यामुळे या वाहनावर एकीकडे दंडात्मक कारवाई केली जाईल तर दुसरीकडे येथील समुपदेशन केंद्रात चालकाला सक्तीने समुपदेशन केले जाईल. सोबत येथे चालकाकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार असल्याचेही भिमनवार यांनी सांगितले. याप्रसंगी नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण आणि शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार उपस्थित होते.

आणखी वाचा- ठाकरेंच्या कार्यकाळात पायाभूत प्रकल्पांकडे दुर्लक्ष, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

ब्रेथ अनालायझर तपासणी

समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर आता सिट बेल्ट, टायरची स्थिती, वाहनाला रिफ्लेक्टर टेप, क्षमतेहून जास्त प्रवासी, अवैध प्रवासी आहेत काय, हे तपासले जाईल. सोबत सात दिवसांत ब्रेथ अनालायझर तपासणी सुरू होऊन मद्य तपासणीही होणार आहे. रस्त्यावर जड वाहन लेनमध्ये चालत नसल्यास त्यांच्यावर कारवाई, अतिवेगाने वाहन चालण्याची तपासणी, अवैध पार्किंग तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.