राखी चव्हाण
नागपूर : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकनात (मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन-एमईई) महाराष्ट्राची कामगिरी उंचावली आहे. रविवारी जाहीर झालेल्या अहवालात राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची नोंद ‘उत्कृष्ट’ गटात, मेळघाट, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री या प्रकल्पाची नोंद ‘खूप चांगले’ गटात आणि बोर व्याघ्र प्रकल्पाची नोंद ‘चांगले’ या वर्गात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मैसुरू येथे रविवारी देशभरातील वाघांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार भारतात ३,१६७ वाघांची नोंद करण्यात आली आहे. यात राज्यनिहाय आकडेवारी नसली तरी व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन जाहीर करण्यात आले आहे. भारतात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा त्याचा गाभा हा ‘इनसीटू’ म्हणजेच जिथे वाघांचा जन्म तिथेच त्यांचे व्यवस्थापन हा होता. यात महाराष्ट्राने दर्जेदार कामगिरीची नोंद करून जगासमोर चांगले उदाहरण उभे केले आहे. वन्यजीव आणि विशेषत: वाघांच्या व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ नसला तरीही तिथल्या व्यवस्थापनावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत दिसून आली आहे. या ठिकाणी वाघ स्थलांतरित करण्यात येणार असून काही हरिणांना येथे सोडण्यात आले आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या आतील सिंचन वसाहत पूर्णपणे दूर सारल्यानंतर येथे वाघांच्या व इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे ते ‘उत्कृष्ट’ या गटात नोंदवले गेले आहे, तर मेळघाट, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिऱ्यातील व्यवस्थापन चांगले आहे. ‘बोर’ व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र अजून यात समाविष्ट झालेले नाही. या व्याघ्र प्रकल्पाला स्वतंत्र संचालक नाही, त्यामुळे ते थोडे मागे पडले असले तरीही पुढील व्याघ्रगणनेत ही त्रुटी दूर होईल, असा विश्वास आहे.
याबाबत राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे-पाटील म्हणाले, की व्याघ्र संवर्धन चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. वाघांची शिकार रोखण्यासाठी केलेली उत्तम कामगिरी व वन्यजीव गुन्हे पथकाची सुरुवात प्रथम महाराष्ट्रात होणे, गावांचे यशस्वी पुनर्वसन आदीमुळे राज्याने आघाडी घेतली आहे. १९७३ पासून ते आजपर्यंत झालेल्या या बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.
दरम्यान, मैसुरूमधील कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षे’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. भारतात केवळ वाघांची संख्या वाढली आहे असे नव्हे, तर त्यांच्या नैसर्गिक उत्पत्तीसाठी पर्यावरणही तयार केले गेले आहे. निसर्गाचे संवर्धन हे देशाच्या संस्कृतीचा भाग असल्याचे पंतप्रधान या वेळी म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित होते.
वर्ष – वाघांची संख्या
२००६ – १,४११
२०१० – १,७०६
२०१४ – २,२२६
२०१८ – २,९६७
२०२२ – ३,१६७
टाळय़ा वाजवून अभिनंदन
‘व्याघ्र प्रकल्पा’चे यश ही केवळ देशासाठी नव्हे, तर सगळय़ा जगासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून टाळय़ा वाजवत ही घटना साजरी करण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले. आगामी काळात ही संख्या अधिक वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पर्यावरण (इकॉलॉजी) आणि अर्थकारण (इकॉनॉमी) यांच्यात संघर्ष नव्हे, तर सहजीवनावर भारताचा विश्वास आहे. वन्यजीवांचे संवर्धन हा जागतिक विषय असून ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’मुळे (आयबीसीए) व्याघ्र प्रजातींच्या संवर्धनास हातभार लागणार आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान