लोकसत्ता टीम

नागपूर : सध्या निवडणुकीची धामधूम सुरु असून शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा बिघडल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल बंदावस्थेत असल्याने वाहतूक कोंडी होत असून नागरिक त्रस्त आहेत. मात्र, बंदावस्थेत असलेल्या सिग्नलकडे महापालिका आणि वाहतूक पोलीस या दोन्ही विभागाचे दुर्लक्ष आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात रस्त्याचे बांधकाम, मेट्रोचे बांधकामासह अन्य कामे सुरु आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत आहेत. वाहतूक सिग्नल नादुरुस्त असल्यामुळे त्याचा सामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून ही समस्या सोडवण्याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून चौकात सिग्नल लावण्यात आले. परंतु, सध्या बरेच सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक अनियंत्रित होत असल्याचे चित्र आहे. शहरात अनेक ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीला वाहनचालक कंटाळले आहेत.

आणखी वाचा-तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…

अनेक ठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु आहे. तसेच वळण रस्त्याचा वापर करण्यासाठी बाध्य केल्या जात आहे. अशोक चौकापासून ते सक्करदरा चौकापर्यंतचा रस्त्यावरील काही सिग्नल अनेकदा बंद असतात. त्यामुळे या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. सकाळी कार्यालयात जाण्याच्या व परत येण्याच्या वेळी रस्त्यावर एकच गर्दी होते. अशा वेळी सिग्नल बंद राहात असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

काटोल नाका चौक, सक्करदरा चौक, मानेवाडा चौक, धरमपेठ चौक, पंचशिल चौक, राजा-राणी चौक, अजनी चौक, प्रतापनगर चौक अशा प्रमुख चौकातीलही वाहतूक सिग्नल अनेकदा बंद असतात. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

आणखी वाचा-आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…

महापालिका-पोलिसांचे एकमेकांकडे बोट

शहरातील सिग्नल व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम महापालिकेचे आहे. सिग्नल दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम महापालिकेचे आहे. तर वाहतूक सिग्नलवर थांबून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. मात्र, सिग्नल बंद असल्यास त्या चौकात वाहतूक पोलीस उभे राहत नाहीत. तर महापालिका सिग्नल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असतात.

अनेक चौकात वाहतूक पोलीस त्यांच्या नियोजनानुसार वाहतूक सिग्नल बंद ठेवतात. मात्र, काही ठिकाणी बंदावस्थेत असलेले वाहतूक सिग्नल दुरुस्तीचे काम सुरु आहे. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महापालिका प्राधान्याने सिग्नल दुरुस्ती-देखभालीकडे लक्ष देते. -राजेंद्र राठोड (वाहतूक विभाग, महापालिका)

Story img Loader