नागपूर : राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावरील विद्युत खांबांवर नायलॉनच्या दोरीत आलेली कागदी तोरणे, पताका कार्यक्रमानंतर काढली जात नाहीत. पावसाळ्यात ती लोंबकळत असून त्याला अडकून दुचाकीस्वारांना अपघात होण्याचा धोका आहे.
देशभरात वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात. संत-महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी व धार्मिक कार्यक्रमातील युवकांचा उत्साह वाखाण्याजोगा असतो. या उत्सवांमध्ये पताका-तोरणे वाहतुकीचा मार्गावर लावण्याची स्पर्धा लागलेली असते. भगवे, निळा, हिरव्या रंगाचे आणि तिरंगी प्लास्टिक तोरणांनी रस्ते सजवले जातात. तसेच राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठीही वातावरण निर्मिती करण्याच्या हेतूने पक्षाचे झेंडे आणि पताका विजेच्या खांबाला दूरवर बांधल्या जातात. ही तोरणे प्लास्टिक दोरीत बांधलेली असतात. कार्यक्रम झाल्यानंतर ती तशीच ठेवलेली असतात. सध्या पाऊस-वादळाच्या वातावरणात ही तोरणे तुटून प्लास्टिक दोऱ्या लोंबळकत असल्यासारख्या रस्त्यावर दिसतात. दुचाकी चालकाच्या गळ्याला पतंगीच्या मांजासारख्या या प्लास्टिक दोऱ्यांपासून धोका आहे.
हेही वाचा… चंद्रपूर: चोरबिटी बियाण्यांची तस्करी करणाऱ्या तिघांवर गुन्हे
पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि वादळामुळे रस्त्यांवरील पथदिव्यांचे खांब कोलमडून पडतात. रस्ता दुभाजकांवरील वीज खांबांना किंवा चौकातील हायमास्कला लावण्यात आलेले केबल, तोरणे, पताका वादळ-वाऱ्याने तुटून रस्त्यावर पडतात. नायलॉनच्या दोरीत ही तोरणे ओवली जातात. ही दोरी तुटत नाही. लोंबकळलेल्या या तोरणांच्या माळेला दुचाकीस्वार अडकला तर त्याला अपघात होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने लोंबणारी केबल, तोरणे-पताका वेळीच काढून टाकावी, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे उत्सव किंवा कार्यक्रम साजरे करणाऱ्यांनाच त्यांनी लावलेल्या पताका, तोरणे काढण्याचे बंधन घालावे, अशी मागणीही सामाजिक संघटनांनी केली आहे.
हेही वाचा… यवतमाळ : पत्नीस जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप
तोरणे काढण्यासाठीही उत्साह दाखवा
राजकीय, धार्मिक, सामाजिक संघटना जो उत्साह ही तोरणे, पताका लावताना दाखवतात तोच उत्साह ही तोरणे, पताका काढण्यासाठी दाखवायला हवा. याच उत्साहाच्या तोरणात अडकून अपघाताचे बळी आपणही ठरू शकता, असे राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक म्हणाले.