नागपूर : संत्रा नगरी म्हणून ओळख असलेल्या नागपूर आणि राज्यातील संत्रा उत्पादकांच्या उत्पादन आणि उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर आता पुढाकार घेणार आहे. याचा एक भाग म्हणून नुकतेच ३०० संत्री उत्पादकांना प्रशिक्षित करण्यात आले असून भविष्यात राज्यातील ३० हजार फळ उत्पादकांना ‘आयआयएम’ प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे विदर्भातील संत्रीच्या उत्पादनात मोठी वाढ होऊन त्याला दर्जेदार बाजारपेठ मिळवण्यासाठी मदत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फळे आणि भाजीपाल्यांची राज्यात पुढील ५ वर्षांपर्यंत वाढती मागणी लक्षात घेऊन तसेच विविध टप्प्यांमध्ये फळ, भाजीपाल्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्कमधून (मॅगनेट) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून ‘मॅगनेट’ आणि ‘आयआयएम’ नागपूर संत्री उत्पादकांना मदत करणार आहे. संत्री उत्पादनासाठी महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅगनेट), भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील ३०० हून अधिक संत्री उत्पादकांसाठी नागपूर ‘आयआयएम’मध्ये एका कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात होते. ही कार्यशाळा म्हणजे एक सुरुवात असून राज्यातील ३० हजार फलोत्पादकांना प्रशिक्षित करण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचे ‘आयआयएम’ने सांगितले आहे. उत्पादकता वाढवणे, हवामानातील बदल, बायोटेक स्ट्रेस हाताळण्याची साधने, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि अंमलबजावणी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. संत्री उत्पादन वाढवण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असून याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार

‘आयआयएम’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री उपस्थित झालेल्या या कार्यशाळेत क्षमता निर्माण आणि देवाणघेवाणीसाठी राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या संस्थांशी करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात कृषी व्यवसाय नेटवर्कला चालना देण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राज्याच्या एसीएस कार्पोरेशन आणि मार्केटिंगचे प्रमुख अनुपकुमार यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iim nagpur initiative to increase orange production training 30 thousand producers in the state ysh