ना जाहिरात, ना मुलाखत; मर्जीतल्या व्यक्तींचीच नियुक्ती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेश गोंडाणे

नागपूर : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत स्थापित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था म्हणजेच ‘बार्टी’मध्ये नियमबाह्य पद्धतीने कंत्राटी भरती करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कुठलीही जाहिरात न देता प्रकल्प अधिकाऱ्यासारख्या महत्त्वाच्या पदावर मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती करत अन्य होतकरू उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे. 

‘बार्टी’ या संस्थेस स्वायत्तता मिळाल्यानंतर सुरू झालेला मनमानी कारभार, अधिकारी कर्मचारी भरतीमध्ये अनियमितता व भ्रष्टचार, नात्यातल्या लोकांच्या नियुक्त्यांची अनेक प्रकरणे याआधीही समोर आली आहेत. ‘समता प्रतिष्ठान’मध्येही नात्यातील व्यक्तींना गैरमार्गाने नियुक्ती देण्यात आल्याचा प्रकार राज्यभर गाजला होता. त्यानंतरही पुन्हा  ‘बार्टी’मध्ये प्रकल्प अधिकारी पदावर नियमबाह्य व जवळच्या, नात्यातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

‘बार्टी’ही स्वायत्ता संस्था असली तरी कुठल्याही पदावर नियुक्ती करताना त्यांना रितसर जाहिरात देणे बंधनकारक आहे. या जाहिरातीमध्ये वेतनासह शैक्षणिक अर्हतेची अट असणे आवश्यक आहे. मात्र, ‘बार्टी’ने भरती प्रक्रियेशी संबंधित अशी कुठलीही प्रक्रिया न राबवता सर्रास भरती सुरू केली आहे. प्रकल्प अधिकारी पदासाठी पदव्युत्तर समाजकार्याचे शिक्षण आवश्यक असते. या पदासाठी किमान ४० ते ४५ हजारांच्या घरात वेतन दिले जाते. मात्र, ‘बार्टी’ने इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या करताना नात्यातील आणि जवळच्या व्यक्तींना नियुक्ती दिल्याचा आरोप होत आहे.

वेतनावर ४० कोटी रुपयांचा खर्च

‘बार्टी’ने बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम बंद केले आहेत.  जे कार्यक्रम सुरू आहेत, त्यांचे कंत्राट  खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. असे असतानाही ‘बार्टी’मध्ये एक हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी कामावर आहेत. त्यांच्या वेतनावर ‘बार्टी’ वर्षांला ४० कोटी रुपयांचा खर्च करते. मात्र, इतक्या संख्येने असणारे कर्मचारी नेमके कुठे काम करतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांची भरती बाह्यस्त्रोत कंपनीकडून करताना ‘बार्टी’ने कुठल्याही प्रकारची जाहिरात दिली नसल्याचाही आरोप आहे.

‘बार्टी’ने भरती प्रक्रियेसाठी बाह्यस्त्रोत कंपनीची निवड केली असून त्यांच्या मार्फत भरती घेतली जाते. संबंधित कंपनी मुलाखती घेऊन निवड करते. यामध्ये प्रत्यक्ष बार्टीचा कुठलाही हस्तक्षेप नसतो.

धम्मज्योती गजभीये, महासंचालक, बार्टी.

 नियुक्ती करायची असेल तर बाह्यस्रोताने करू नका. त्यासाठी जाहिरातीची मान्यता घेऊन अनुभव, कामाचे स्वरूप, शिक्षण या सर्वाची तपासणी करून संविधानिक मार्गाने निवड करा. सामाजिक न्यायाची भाषा करणाऱ्या विभागातच नियमांची पायमल्ली होत असेल तर ही खेदाची बाब आहे. 

ई. झेड. खोब्रागडे, निवृत्त सनदी अधिकारी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal contract recruitment barty ysh