यवतमाळ : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारू विक्री करण्यात आली. एका कारवाईदरम्यान हा प्रकार समोर आला. या दारू विक्रीचे संयुक्तिक कारण विक्रेता देऊ शकला नाही. त्यामुळे निवडणूक काळात खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कळंब येथील मे. एम.पी. ट्रेडर्स (एफएल २) या मद्यविक्री दुकानाचा परवाना येत्या ४ जूनपर्यंत निलंबित केला आहे. मनीष सुरेश जयस्वाल, रा. यवतमाळ असे अनुज्ञप्तीधारकाचे नाव आहे.
मनीष जयस्वाल याचे कळंब येथे मद्यविक्रीचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी वर्धा येथील रामनगर पोलिसांनी एका चारचाकी वाहनावर कारवाई करत विदेशी दारूचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी अटकेतील आरोपीने कळंब येथून दारूसाठा आणल्याची कबुली दिली होती. मनीष जयस्वाल हा अनुज्ञप्तीधारक एफएल २ दुकानातून ठोक व चिल्लर विक्री करतो. तेथून वर्धा जिल्ह्यात दारूचा पुरवठा होतो, ही बाब चौकशीत समोर आली. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याची सीमा कळंबपासून जवळ आहे.
हेही वाचा…‘‘नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल भाजपला ठाऊक आहे का?’’
त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान एम.पी. ट्रेडर्समधून मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यात दारूसाठा येण्याची शक्यता होती. पोलिसांनी दिलेला प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीतेश शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यावेळी दारूविक्रेता मनीष जयस्वाल हा विदेशी दारूविक्री संदर्भात सुयंक्तिक कारण देऊ शकला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या दुकानाच्या मद्यविक्रीचा परवाना ४ जूनपर्यंत निलंबित केला आहे.
हेही वाचा…रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे भवितव्य न्यायालयाचा निकाल ठरवणार; सोमवारी सुनावणी
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अवैध दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. आमीष म्हणूनही दारू पुरविली जाते. कळंब, राळेगाव या तालुक्यांतून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा पोहचविला जातो, हे अनेकदा कारवाईंतून स्पष्ट झाले. यावेळी त्यासंदर्भात ठोस पुरावा मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मद्यविक्रीचा परवानाच निलंबित केल्याने कळंबमधील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.