नागपूर : दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, सोबतच वाढणारी प्रवासी संख्या या तुलनेत रेल्वेगाड्या उपलब्ध होत नसल्याने विनातिकीट किंवा सर्वसाधारण तिकीट घेऊन शयनयान डब्यातून प्रवास करणाऱ्या अवैध प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. रेल्वे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबवून देखील अवैध प्रवासी संख्या कमी होताना दिसत नाही.
रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट किंवा अनियमित तिकीटधारक प्रवास करतात. त्यामुळे आरक्षित डब्यात गर्दी होते आणि लांब पल्ल्यांचा प्रवास करणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात वारंवार तक्रार येत असतात. तसेच रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम राबवून अवैध प्रवाशांना दंडित केले जाते. त्यांना आर्थिक दंड करण्यात येतो. परंतु कोणत्याही परिस्थिती त्यांना प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याने आर्थिक दंड सहन करूनही अवैध प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी विनातिकीट आणि सर्वसाधारण तिकीट घेऊन शयनयान डब्यातून प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कालावधीत तिकीट तपासणीतून २३.९८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. २०२३ ते २०२४ या कालावधीचा विचार करता आर्थिक दंडाच्या रकमेत १४.२ टक्के वाढ झाली आहे.
प्रवासी उत्पन्न
नागपूर विभागाचे जानेवारी २०२५ महिन्यात ५९.२५ कोटी प्रवासी तिकीटांमधून उत्पन्न झाले. एप्रिल २००४ ते जानेवारी २०२५ दरम्यानचे एकूण प्रवासी उत्पन्न ६०१.६१ कोटी इतके असून, यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १२.५ टक्के वाढ झाली आहे.
पार्सल उत्पन्न
पार्सल वाहतूक ही उत्पन्न वाढीसाठी एक महत्त्वाची घटक ठरली आहे. नागपूर विभागाने जानेवारी २०२५ मध्ये पार्सल सेवांमधून १.२५ कोटी उत्पन्न मिळवले, जे जानेवारी २०२४ च्या तुलनेत ९.८ टक्के वाढ दर्शवते. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान एकूण पार्सल उत्पन्न १४.९९ कोटी इतके असून, मागील वर्षाच्या तुलनेत १५.३ टक्के वाढ नोंदवली आहे.
तिकीट तपासणी उत्पन्न
विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरुद्ध कडक मोहिमेअंतर्गत, नागपूर विभागाने डिसेंबर २०२४ महिन्यात व्यापक तिकीट तपासणीद्वारे १.९६ कोटी दंड आणि शुल्काद्वारे उत्पन्न मिळवले, जे डिसेंबर २०२३ च्या तुलनेत ८.७ टक्के वाढ दर्शवते.