बुलढाणा: बुलढाणा जिल्हा व मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पुन्हा एकदा अवैध शस्त्र तस्करीची घटना उघडकीस आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १९ सप्टेंबर रोजीच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणारे दिग्गज नेत्यांचे राजकीय दौरे, विविध विरोधी राजकीय पक्षांच्यावतीने करण्यात येणारी आंदोलने, उत्सव सण, नवरात्र उत्सव लक्षात घेता पोलीस विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे. बुलढाणा जिल्हा आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमा लागून आहे. या सीमावर्ती भागात मोडणाऱ्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या भागातील सोनाळा, तामगाव आणि जळगाव जामोद पोलीस ठाणे अंतर्गतच्या गावांतून होणारी अवैध शस्त्र तस्करी, खरेदी विक्री, शस्त्र वाहतूक, शस्त्र जवळ बाळगणे याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात( खामगाव) बी.बी.महामुनी ( बुलढाणा) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे निर्देश दिले. यासाठी पथके गठीत करण्यात आली आहे.
हे ही वाचा…आमिर खान २१ सप्टेंबरला अकोल्यात, शेतकऱ्यांशी संवाद साधणार
या पार्श्वभूमीवर संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या तामगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील शिवनी करमोडा मार्गावरील दयाल नगर शिवारात एका व्यक्तिकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.पथकाना मिळालेल्या माहितीवरून दयालनगर शिवारात सापळा रचण्यात आला. यावेळी मोटारसायकल ने आलेल्या युवकाला अडवून त्याची अंगझडती घेण्यात आली.त्याच्या जवळून पाऊण लाख रुपये किंमतीचे दोन देशी बनावटीची पिस्तूल, शहा हजार रुपये किंमतीची सहा काडतुसे आणि मोटारसायकल असा दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील या युवकाला तामगाव पोलीस ठाण्या मध्ये आणण्यात आल्यावर त्याची स्थानिक गुन्हे शाखा आणि तामगाव पोलिसांनी कसून चौकशी करण्यात आली.अग्निशस्त्र आणि काडतुसे बाळगणाऱ्या युवकाचे नाव इरफान लतीफ पटेल ( २० वर्षे, राहणार पातूरडा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा)असे असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याने शस्त्र कुठून आणि कुणाकडून विकत घेतले, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? याची चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले. यादृष्टीने शोध घेण्यासाठी विशेष शोध पथक गठीत करण्यात आले आहे. तसेच तपासा साठी पोलीस दलाच्या तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे.
हे ही वाचा…Rain In Maharashtra : गणरायाला निरोप अन् पावसाचे आगमन; भारतीय हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकात सहायक पोलीस निरीक्षकआशिष चेचरे, पोलीस उप निरीक्षक सचिन काकडे, पोलीस हवालदार दीपक लेकुरवाळे, समाधान टेकाडे, पोलीस जमादार एजाज रफिक खान, अजीज परसुवाले, ऋषिकेश खंडेराव यांचा समावेश होता.