‘आयएमए’कडून १८ जूनला निषेध दिन
नागपूर : रामदेवबाबा हे अशिक्षित व्यक्ती आहेत. त्यांनी योगा वगळता कोणतेही शिक्षण घेतलेले नाही, अशी टीका इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव यांनी केली. मंगळवारी आयएमएच्या १८ जून रोजी आयोजित निषेध दिनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एखाद्या विषयाच्या विरोधात बोलताना प्रथम पुढच्याला त्याबाबत ज्ञान असावे लागते. परंतु रामदेवबाबांना अॅलोपॅथी सोडा, होमिओपॅथी, आयुर्वेदबाबतही फारसे कळत नाही. त्यांनी योगाचे शिक्षण घेतले असून त्या विषयात ते चांगले काम करत असल्याचे आयएमएनेही मान्य केले आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्याने किती योगा करावा, हे निश्चित करावे लागते. एखाद्याने क्षमतेहून जास्त योगा केल्यास त्याला दुष्परिणाम संभवतात. हे रामदेवबाबांनी समजण्याची गरज आहे. ते कुठेही फालतू बडबड करत असून त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्या चुकीच्या वक्तव्याविरोधात आयएमए न्यायालयीन लढा लढत असल्याचेही डॉ. आढव म्हणाले.
डॉ. प्रकाश देव म्हणाले, डॉक्टरांवर होणारे हल्ले समाजाला शोभणारे नाही. डॉक्टर रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा देत असतो. परंतु त्यांच्यावरील हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे रुग्ण मोठ्या रुग्णालयात पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात वेळ जाऊन रुग्णाची प्रकृती खालावण्याचा धोकाही वाढतो. आयएमएच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे म्हणाले, डॉक्टरांवरील हल्ल्याच्या विरोधात १८ जूनला आयएमएकडून देशभरात निषेध दिन पाळला जाणार आहे. आंदोलनातून सरकारकडे डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा तयार करावा, सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित केले जावे, रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करावे, हल्लेखोर व्यक्तीवरील खटले जलद न्यायालयात चालवण्याची मागणी केली जाणार आहे. सचिव डॉ. सचिन गथे म्हणाले, सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. याप्रसंगी डॉ. प्रकाश देव, डॉ. कृष्णा पराते, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. मंजूषा गिरी उपस्थित होते.