नागपूर : होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा यंदा महिनाभर आधीच सुरू झाला आहे. उन्हाळ्याची नुसती सुरुवातच झालेली नाही तर उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने नागरिकांना त्रस्त केले आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रच नाही तर देशाच्या अनेक भागांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. देशाची राजधानी दिल्लीत रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडी असली तरीही दिवसा तापणारे उन्ह मात्र चटका देणारेच आहे. साधारण होळीला उन्हाची सुरुवात होते आणि एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात होते.

यंदा एप्रिल आणि मे महिना अजून यायचाच आहे. एवढेच नाही तर मार्च देखील यायचा आहे आणि असे असतानाच उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये आतापासूनच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. फेब्रुवारीपासूनच कमाल तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

महाराष्ट्रातून हिवाळा कधीचाच हद्दपार झालाय. दरम्यानच्या काळात रात्री आणि पहाटे थंडी तर दिवसा उन्ह अशी स्थिती होती. मात्र, आता पूर्णपणे उन्हाळ्याची सुरुवात राज्यात झाली आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच कमाल तापमानाने चाळीशी पार केली. त्यामुळे यंदाचा एप्रिल, मे महिना आणखी किती तापदायक असणार अशी भीती आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवणार आहे. तर, कोकण आणि जवळच्या परिसरात उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती असून याठिकाणी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

विदर्भातही उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून उन्हाचे चटके देखील जाणवत आहेत. उत्तर महाराष्ट्रात मात्र अजूनही काही ठिकाणी पहाटेच्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये गारठा जाणवत आहे. दरम्यान, २५ आणि २६ फेब्रुवारी असे दोन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी तर २६ फेब्रुवारीला पालघर येथे तापमानवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण राज्यातच येत्या काही दिवसात तापमानवाढ कायम राहील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.  त्यामुळे यंदा उन्हाळा कडक तापणार हे निश्चित आहे.