नागपूर : राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनंतर देशाच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा आहे, पण बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज आहे. राज्यातील तापमान येणाऱ्या तीन दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, नाशिक, पुणे आदी शहरांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात तापमानाचा पारा चढलेला आहे. उष्णतेपासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशातील अनेक भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडे पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे देशाच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य भारतामध्ये कमाल तापमानात वाढ होत आहे. तर, दक्षिण भारतात देखील तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात मात्र उन्हाच्या झळांना सुरुवात झाली आहे. राज्यातील आणि त्यातही विदर्भातील अधिकांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किमान आणि कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.

विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यात दिवसागणिक वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच राज्यात कमाल तापमानाने चाळीशी गाठली होती. सध्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये करण्यात आली असून, याठिकाणी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. काही भागांमध्ये मात्र उन्हाचे चटके आणि थंडी असे दोन्ही जाणवत आहे. दिवसा घाम फोडणारा उकाडा असतानाच रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र हवेत गारठाही जाणवत आहे. मुंबईसुद्धा या उष्म्याला अपवाद नाही.

शहरात सध्या कमाल तापमान वाढले असून उन्हाचे चटके जाणवत आहेत. कोकण किनारपट्टी क्षेत्रासह राज्यातील सागरी किनारपट्टी भागामध्ये दमट वातावरणात वाढ झाली आहे. समुद्राच्या पृष्ठावरून वाहणारे उष्ण वारे तीव्र उन्हाळ्याची जाणीव करून देत आहेत. मुंबई, ठाणे, पालघरसह रत्नागिरी आणि बहुतांश कोकणालाही उन्हाचा तडाखा बसतना दिसत आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे उकड्यात प्रचंड वाढ होणार आहे. हवामान खात्याने २३ फेब्रुवारीपर्यंत देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालच्या गंगा मैदानात २३ फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये २२ आणि २३ फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ओडिशामध्ये २३ फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Story img Loader