नागपूर : भारतीय हवामान खात्याने विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या आगमनाचा इशारा आहे. विशेषकरून मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. राज्यातून थंडीने पूर्णपणे काढता पाय घेतला आहे असे वाटत असतानाच गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात घाट दिसून येत आहे. तर रात्रीच्या वेळी थंड वाऱ्याची झुळूक आणि हलकी थंडी सुद्धा जाणवत आहे. तर त्याचवेळी दुपारी मात्र उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ऊन आणि थंडीचा खेळ रंगला आहे.
मात्र, असे असतानाच भारतीय हवामान खात्याने आता विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा देत “येलो अलर्ट” जाहीर केला आहे. रविवारी राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आजपासून अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भ, आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत. त्यामुळेच पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा…नागपूर : दोन बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले, एएचटीयूने मध्यप्रदेशातून केली आरोपींना अटक
२६ आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा , अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय रविवारी पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका किंवा मध्यम पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.