नागपूर : राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घसरण तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ दिसून येत आहे. मात्र, हवेतील गारठा वाढल्याने थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे, पण त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने काय म्हटले आहे?
अवकाळी पावसानंतर राज्यात किमान तापमानात घसरण झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या दोन दिवसात राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढणार असून तापमानात तीन ते चार अंशांनी घसरण होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर तापमानात पुन्हा एकदा दोन ते चार अंशांनी वाढ होणार असून विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा >>> नागपुरात दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’? गडचिरोलीत चार संशयित रुग्ण, नमुने तपासणीसाठी ‘एम्स’मध्ये
हवामानाची स्थिती काय?
भारताच्या वायव्य भगत नव्याने पश्चिमी चक्रावात तयार झाला आहे . तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढण्यास मदत होतेय. मागील दोन दिवसांपासून तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. कधी तापमानात वाढ तर कधी तापमानात घसरण होत आहे. मात्र, हवेतील गारठा वाढला आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
हवामानाचा अंदाज नेमका काय?
कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या काही तासात तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असून किमान तापमानात घसरण होणार आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १० जानेवारी व ११ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय .
राज्यातील तापमानाची स्थिती काय?
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात किमान तापमानात चढ उतार दिसून येत आहे. राज्यात कोरडे वारे वाहत असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा उतरलाय. विदर्भात देखील किमान तापमानात चढ उतार दिसून येते आहे. विदर्भात किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवरून 13 अंश सेल्सिअसवर पोहचले. तर पहाटे गारठा वाढला होता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात घसरण झाली होती.