नागपूर : ऑगस्टच्या तुलनेत देशात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाच्या काही भागात सप्टेंबर महिन्यात सामान्य पातळीपेक्षा कमी तर बहुतांश भागात सामान्य पातळीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात १६७.९ मिलिमिटर या दीर्घकालीन सरासरीच्या १०९ टक्के पाऊस सप्टेंबरमध्ये पडण्याचा अंदाज आहे. असना वादळामुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य भारतामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज असून, विदर्भ, कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस विदर्भात, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट, तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या राज्यात अतिमुसळधार
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि मध्य प्रदेशलगतच्या भागांसह देशाच्या वायव्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात पाऊस किती?
संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्यात सामान्य पातळीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस पडला आहे. वायव्य भारतात २५३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, २००१ नंतर ऑगस्टमध्ये महिन्यात पडलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे. देशात ऑगस्टमध्ये सरासरी २४८.१ मिमी पावसाच्या तुलनेत २८७.१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा >>> वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना
या भागात पाऊस कमी
केरळ, विदर्भासह अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी होते. मान्सूनला सुरूवात झाल्यापासून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश व ईशान्येकडील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे दिसून आले. केरळ आणि महाराष्ट्रातील विदर्भ या प्रदेशासह ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये पाऊस कमी पडला.
कमी पावसाची शक्यता कुठे?
सध्या सप्टेंबर महिन्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि बिहार राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच लडाख, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, तर पंजाब आणि हरयाणाच्या काही भागात पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज आहे.
जास्त पावसाचा अंदाज कुठे? महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून, विदर्भ आणि कोकणातील सर्व भागातही अधिक पाऊस होऊ शकतो. त्यातही पूर्व विदर्भ आणि कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर अधिक राहील, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहील.