नागपूर : जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहूतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून येत्या १८ जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता वर्तवली  आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला आहे. जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उच्च शिक्षण संचालकांविरुद्ध १० रुपयांचा जामीनपात्र वॉरंट….पण, माफी मागितल्याने….

मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर याचवेळी वाऱ्याचा वेगळी ताशी ४० ते ५० किलोमीटर राहील, असा अंदाज आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल. दरम्यान, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे शहर पावसाच्या पाण्याने तुंबले. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात देखील पावसाने जोर पकडला आहे. कोकणातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हेही वाचा >>> सायबर गुन्हेगाराच्या खात्यातून व्यावसायिकाला परत मिळाले ४ लाख २८ हजार…

पश्चिम विदर्भात मूसळधार पावसाने हजेरी लावली असली तरीही पूर्व विदर्भात मात्र उकाडा आणि उन्हाने नागरिक त्रस्त होते. मात्र, रविवारपासून पूर्व विदर्भात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस असाच कायम राहील्यास उकाड्यापासुन सुटका होईल. तर त्याचवेळी पावसाअभावी थांबलेल्या पेरण्यांना देखील वेग येईल. जून महिन्यात मोसमी पावसाने वेळेआधीच आगमन केले, पण पावसाची मोठी तूट याकाळात होती. आगमनाची वर्दी देऊन मोसमी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले. लवकर येणारा मोसमी पाऊस आणि हवामान खात्याच्या अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात पेरणीला सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. दरम्यान, आता पुन्हा एकदा मोसमी पावसाने वेग पकडला आहे. तर हवामान खात्यानेही पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predicts heavy to very heavy rains in maharashtra till 18th july rgc76 zws