नागपूर : उन्हाळ्याची खरी चाहूल लागते ती होळीनंतर. यंदा मात्र अगदी विपरीत घडले आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. याच पूर्वार्धात तापमानाने चाळीशी गाठली आहे. एकीकडे उन्हाचे चटके तर दुसरीकडे उकाड्यामुळे घामाच्या धारा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमाल तापमानच नाही तर किमान तापमानात देखील वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, आता हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर त्यानंतर पुन्हा उन्ह परतणार आहे.

इशान्य भारतात सध्या चक्राकार वारे वाहत असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल,ओडिशा या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाच्या तुरळक सरी कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, विदर्भासह राज्यात सर्वत्र कमाल तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राजधानी मुंबईत देखील शनिवारी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस पलीकडे गेले होते. ठाण्यात देखील ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अलीकडच्या काही वर्षात पुण्यात देखील तापमानाचा पारा वाढायला लागलाय. पुण्यात देखील काल ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

मराठवाड्यातील लातूर येथे ३७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते. तर छत्रपती संभाजीनगर इथेही ३६ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात राज्यातील सर्वाधिक ३९.७ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

हवामान खात्याने दोन दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा इशारा दिला असला तरीही तापमानात फार बदल होणार नाही. विदर्भासह संपूर्ण राज्यात तापमान वाढलेलेच राहील. गेले काही दिवस पहाटे आणि रात्री गारवा जाणवत होता।. मात्र, आता पूर्णपणे उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी उन्हाचे चटके आणि उकाडा असा दोन्हीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.