नागपूर : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा राज्याच्या दरवाजा ठोठावला आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असतानाच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाच्या आगमनाची वर्दी दिली आहे. याचा मोठा फटका विदर्भातील चार जिल्ह्यांना बसू शकतो. राज्यातल्या काही जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर तर काही जिल्ह्यातील तापमान चाळीसच्या जवळपास आहे. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदलाचे संकेत देण्यात आले आहेत.
शनिवारपासून मंगळवारपर्यंत म्हणजेच १६ ते १९ मार्चदरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्याची उपराजधानी नागपूरसह अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यातील हवामानात उद्यापासून( शनिवार) बदल होण्याची शक्यता आहे. यादरम्यान ढगाळ वातावरण राहील. विदर्भात सूर्यनारायण तळपत असताना आणि तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असतानाच आता सोबतच अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरणे राहिले नाही सोपे! कागदपत्रात आणखी एका प्रमाणपत्राची भर
शनिवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता असून याठिकाणी हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. तर रविवारी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून याठिकाणी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला. तसेच नागपूरसह चंदपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. सोमवारी देखील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे असणार आहे.