राखी चव्हाण, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : गेल्या महिन्याभरापासून जलधारांबाबत ‘सुवार्ता’ची नवनवी आवर्तने देणाऱ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज दर दोन दिवसांनी बदलत असल्यामुळे भाकितांबरहुकूम नक्की पाऊस कधी येणार, हा प्रश्न घामाच्या धारांनी थबथबलेल्या सामान्य नागरिकांना यंदा अधिकच पडला आहे.

हवामानात वेगाने होणारे बदल हवामान अंदाजाच्या काही बाबींना आव्हानात्मक बनवत असले, तरी मोसमी वाऱ्यांच्या सतत फसत जाणाऱ्या अंदाजांमुळे ‘हवामान मॉडेल्स’च्या मर्यादा उघड झाल्या असून खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

हवामान परिस्थितीचा चांगला अंदाज व्यक्त करू शकणारे हवामान मॉडेल्स गडगडाटी वादळासारख्या लहान घटनांचा अंदाज अचूक लावूच शकतील, असे नाही. तसेच तापमानाचा अंदाज उत्तम सांगणारे हवामान मॉडेल्स पावसाचा अंदाज वर्तवताना मात्र बरेचदा चुकतात.  भारतातील हवामान मॉडेल्स काही दशकांपूर्वीच्या मॉडेल्सच्या तुलनेत बरेच अचूक झाले आहेत. परंतु, ते आणखी अचूक करण्यासाठी त्यात सुधारणा आवश्यक आहेत. सर्वसामान्य लोकांना मोसमी पावसाची नीट ओळख नाही. वाऱ्याच्या दिशेवरून तो ओळखला जातो. हवामान खात्याच्या मॉडेलमध्ये पाऊस किती पडणार, तो पडणार की नाही, याचा अंदाज कधी कधी बदलतो. मात्र, वाऱ्यांची दिशा आणि तापमान हे या मॉडेलमध्ये स्थिर असतात. हवामान खात्याकडून मात्र वाऱ्यांची दिशा न तपासताच मोसमी पावसाचे आगमन जाहीर केले जाते. केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर साधारणपणे महाराष्ट्रात पाऊस येण्यासाठी दहा दिवस लागतात. यादरम्यान वाऱ्यांची दिशा बदलून मोसमी पाऊस मागेपुढे होऊ शकतो. संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यांची दिशा पश्चिम किंवा दक्षिण पश्चिमेकडून असते, तर भारतात उर्वरित ठिकाणी म्हणजेच दिल्ली वगैरे भागात वाऱ्याची दिशा वेगळी असते. जमिनीवर आणि जमिनीपासून सुमारे १५ हजार फुटापर्यंत वारे पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिमेकडून येतात तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मोसमी पाऊस असतो. हा मोसमी पाऊस मागेपुढे होऊ शकतो. मोसमी पावसाचे पुर्वानुमान करणे इतके सोपे नाही. मोसमी पावसाच्या आगमनाचे काही निकष आहेत आणि प्रत्येक वेळी ते निकष लागू पडतीलच असे नाही. मोसमी पावसाच्या वाऱ्यांची जशी दिशा आहे, तसेच ढगांच्या बाबतीतही काही निकष आहेत. मोसमी पावसाचे ढग मध्यम उंचीचे आणि दूरवर पसरलेले असतात. तसाच मोसमी पाऊसदेखील गडगडाट न करता सातत्य राखून संथपणे बरसत असतो. किमान दोन दिवस सातत्याने चालणारी पावसाची रिमझिम म्हणजेच मोसमी पाऊस होय. परंतु मोसमी आणि वळिवाच्या पावसात अजूनही आपल्याकडे गफलत केली जाते.

समन्वयाचा अभाव..

भारतीय हवामान खात्याच्या मदतीसाठी व मोसमी पावसाच्या अचूक माहितीसाठी हवामान संशोधन केंद्र- म्हणजेच ‘आयआयटीएम’ (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी) ही हवामानावर संशोधन करणारी संस्था कार्यरत आहे. मात्र, या दोन्हीमध्ये समन्वयाचा अभाव आणि श्रेयवाद आहे.

सुधारणा गरजेची..

हवामानातील घटनांचे अंदाज सुधारायचे असल्यास हवामान मॉडेल्स सुधारावे लागतील. त्यासाठी सुपर संगणकांची क्षमता आणि त्यातील डेटांवर प्रक्रिया करून त्याची गती वाढवावी लागेल. हवामान मॉडेल्स सुधारणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी बराच वेळ आणि गुंतवणूक देखील आवश्यक आहे. त्यामुळे डॉप्लर हवामान रडारचा वापर करून हवामानातील घडामोडींचा वास्तविक शोध आणि निरीक्षण सुधारण्यसाठी तितकेच लक्ष केंद्रीत करावे लागेल. रडार हे गडगडाटी वादळ शोधण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

अक्षय देवरस, हवामान अभ्यासक, रेडिंग विद्यापीठ, इंग्लंड

पूर्वमोसमीची धडक..

समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे सध्या महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांतही पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली . ठाणे, रायगड जिल्हा, मुंबई आणि उपनगरांतील काही भागात गुरुवारी संध्याकाळी पावसाची हजेरी लागली. त्यामुळे  कार्यालयात भर उन्हात पोहोचलेल्या नोकरदार वर्गाला छत्रीविना घरी परतताना पावसाने भिजवून सोडले.

थोडे वर्तमान..

अंदमानात मोसमी वारे यंदा खूप आधीच दाखल झाल्याची वार्ता दिली गेली. त्यानंतर केरळ, गोवा आणि महाराष्ट्रापासून उत्तरेत जाण्याच्या दिशेचे अंदाजित वेळापत्रकही सांगण्यात आले. मात्र उत्तेरेकडच्या उष्णतेच्या लाटेने मोसमी पावसाचा प्रवास दक्षिणेत थोपवून धरला. वाऱ्यांची गती आणि दिशा थांबून पूर्वमोसमी वाऱ्यांनी जिथे पाऊस सहसा जोर धरत नाही, तिथे तो धो धो आणि जिथे कोसळतो तिथे प्रतीक्षा स्थिती करून ठेवली आहे.

संगमनेरमध्ये चौघांचा मृत्यू

संगमनेर : संगमनेरमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने चौघांचा बळी गेला तर दोघे गंभीर जखमी झाले. अकलापूर येथे घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर मालदाड परिसरात झाड अंगावर पडून एका तरुण शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी घरांची वादळात पडझड झाली.

अंदाजाचे नवे आवर्तन..

मोसमी पावसाच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने येत्या दोन दिवसांत त्याचा तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने नव्या अंदाजाद्वारे व्यक्त केली आहे.

थोडा इतिहास..

महाबळेश्वरमध्ये जुलै २०२१ मध्ये तीन दिवसांत १५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला, पण याचा योग्य व अचूक अंदाज हवामान मॉडेल्सला देता आला नाही. वीज पडणे, अचानक पूर, भूस्खलन यांसारख्या उच्च-परिणामकारक घटना हवामान मॉडेल्सच्या कमी अंदाजाच्या कालावधीमुळेच चिंतेचा विषय ठरत आहेत.