नागपूर : पावसाने गणरायाच्या विसर्जनात कोणताही अडथळा आणला नाही. त्यामुळे भाविकांनी गणरायाला उत्साहात, वाजतगाजत निरोप दिला. मात्र, आता पाऊस पुन्हा परतला आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा “अलर्ट” दिला आहे.
पाऊस पुन्हा का परतला ?
राज्यात संपूर्ण गणेशोत्सवात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या, पण कुठेही मुसळधार पाऊस झाला नाही. दरम्यान, आता झारखंड आणि छत्तीसगड परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
पावसाचा जोर कुठे?
संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहे.
हेही वाचा >>> Video : एसटी बस पेटली, मेळघाटात रात्रीच्यावेळी प्रवाशांचा थरकाप; सुदैवाने…
कोणत्या जिल्ह्यात अलर्ट
शुक्रवार, २० सप्टेंबरला परभणी, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २१ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. २३ सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा >>> PM Modi To Visit Wardha : ‘नो फ्लाय झोन’… पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी खबरदारी
हवामान खात्याचा अंदाज काय ?
पाऊस परतेल असे वाटत असतानाच राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतला आहे. कोकण, मध्य, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भासह बाकीच्या भागातही पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
इतर राज्यांची स्थिती काय? पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. गंगा डेल्टा आणि बांगलादेशाजवळील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे या प्रदेशांमध्ये अतिवृष्टी होत आहे.