नागपूर : हवामान खात्याने १९ जुलैनंतर विदर्भात सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्येही हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. बंगालच्या उपसागरावर शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पूर्व भारत आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मध्यम ते मुसळधार पावसानंतर अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती येथे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ठाण मांडले आहे. त्याचवेळी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूरचे व्यापारी ‘या‘ समस्येने आहे भयग्रस्त, कारणही आहे धक्कादायक…

प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अशा स्थितीत शुक्रवार, १९ जुलैपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. तसेच पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात जोरदार तर संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या बळकट सक्रियेतून व्यापक परिक्षेत्रावर अधिक काळ सतत पडणारा झडीच्या पाऊस कोकण व विदर्भ, वगळता महाराष्ट्रात अजूनही पडलेला नाही. मात्र, सध्य:स्थितीतील वातावरणीय प्रणाली पाहता ही स्थिती निवळण्याची देखील शक्यता आहे. बुधवारी विदर्भात अकोला आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा >>> १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान, एक पीएसआय जखमी; गृहमंत्री गडचिरोली जिल्ह्यात असतानाच चकमक

नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जवळपास सर्वत्र मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी संपूर्ण कोकणात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला. मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही पावासचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला. १८ आणि १९ जुलैला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  त्याचबरबोर संपूर्ण विदर्भात पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd warned of heavy rains in vidarbha after july 19 orange alert in many districts rgc 76 zws