नागपूर : राज्याचा हवामानात सातत्याने बदल घडून येत आहेत. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा दाह वाढतच चालला आहे. विदर्भातील शहरांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअस पलीकडे गेले होते. अजूनही तापमानाचा पारा उंचावला असताना दरम्यानच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तापमान घसरले, पण अवकाळी संपताच पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतली असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट महाराष्ट्रावर डोकावत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ढगांचा गडगडाट कुठे
हवामान खात्याने हिंगोली जिल्ह्याला ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिला असून, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागांमध्ये पुढच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा इशारा देण्यात आला असला तरीही उकाडा मात्र कायम असणार आहे.
अवकाळीचा कहर का ?
काही दिवसांपासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला वेग आल्यानेदेखील पावसाचा अनपेक्षित शिडकावा पाहायला मिळत आहे.
तापमानात फारशी घट नाहीच
राज्यात तापमानाच चढ-उतार सुरू असले तरीही त्यात फारशी घट होत नाही. त्यामुळे पाऊस आला तरीही नागरिकांना फारसा दिलासा नाही. एकंदरच आठवड्याच्या शेवटीसुद्धा हवामानात चांगलाच बदल होत आहे. त्याचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी समोर येत आहे. त्यामुळे याची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
गारपीट कुठे महाराष्ट्रात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचे संकट आहे. पुढचे तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.