नागपूर : राज्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून जोर धरला असतानाच आता हवामान खात्याने आणखी दोन दिवस विदर्भ तसेच मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्राच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे आणि गुजरातपासून केरळपर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत. देशभरात सक्रिय असणाऱ्या याच हवामान प्रणालीचे थेट परिणाम मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर दिसून येत आहेत. सप्टेंबर महिना सुरु होताच राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात येत्या ४८ तासात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : मंकीपॉक्स वाढतोय.. पण राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक लस नाही…

शनिवार, रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह खान्देशातील अनेक गावांना पूर, स्थलांतरण अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पावसामुळे हाती आलेली पिके तर गेलीच, पण वीज पडून मानवी मृत्यूंसह जनावरांचे मृत्यू देखील झाले. या तीन दिवसात विदर्भात पुरामुळे सहा जणांचा बळी गेला. काही ठिकाणी वाहने पाण्याखाली गेली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान आता पुन्हा एकदा पावसाचे संकट गडद होताना दिसणार आहे. ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणीसह सातारा आणि पुण्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात देखील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ : बाबाजी दाते कला, वाणिज्य महाविद्यालयावर शासनाची कृपादृष्टी! गुणांकन कमी असतानाही…

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील. तर, ठाणे, पालघर याठिकाणी देखील पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरीही विदर्भ, मराठवाडा, खान्देशात मात्र पावसाने जोर पकडला आहे. ऑगस्ट महिना साधारण गेला असला तरीही सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे शेतकरी सर्वाधिक हवालदिल झाला आहे. तर सर्वसामान्यांचे जीवन देखील विस्कळीत झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd warned vidarbha and marathwada of heavy to very heavy rain for two more days rgc 76 zws