पाच वर्षांत २ हजार ८६२ दाम्पत्यांचा घटस्फोट; आर्थिक तडजोड करताना खटके
अनिल कांबळे
प्रेम करताना सुखी संसाराची अनेक स्वप्न रंगवणाऱ्या प्रेमीयुगुलांची प्रेमविवाहानंतर अगदी सहा महिन्यांतच मने दुभंगत आहेत. गेल्या पाच वर्षांत २ हजार ८६२ दाम्पत्यांनी प्रेमविवाहानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.८० टक्के प्रेमविवाहास कुटुंबीय तयार होत नाहीत. जात-धर्म, मुलाचे वय, आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे साधन, आईवडिलांची प्रतिष्ठा अशा अनेक कारणांमुळे प्रेमविवाह नाकारला जातो.
त्यामुळे अनेक प्रेमीयुगुल कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन विवाह करतात. काही प्रेमीयुगुल तर थेट घरातून कपडे, पैसे, दागिने घेऊन पळून जाऊन बोहल्यावर उभे होतात. लग्न झाल्यानंतर मात्र अडचणींचा ससेमिरा सुरू होतो. त्यासाठी तडजोड करताना खटके उडायला लागतात. वाद-विवाद वाढून संसार मोडण्याची स्थिती निर्माण होते.
अटी-शर्थींचा अतिरेक
प्रेमविवाह झाल्यानंतर अनेकदा प्रेमीयुगुलांचा अटी व शर्थीनुसार संसार सुरू होतो. लग्न झाल्यानंतर दोघांत सासरच्या मंडळींचा हस्तक्षेप नको असतो. सध्या बाळ नको, माहेरचे येणार तर सासरचे नको, नोकरी करणार, नाही करणार, मित्रांसोबत पार्टी हवी की नको, अशा अनेक कारणातून वाद विकोपाला जातात.
चारित्र्यावर संशय
लग्नापूर्वी तू असा वागायचा, आता तुझ्यात खूप बदल झाला… तू मला वेळ देत नाही, तुझे कुठे बाहेर कुणाशी संबंध तर नाहीत ना… अशा अनेक संशयांचे जाळे अधिक घट्ट होत जाते. काही प्रकरणात मुलेही प्रेयसी असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतात. चारित्र्यावर संशय हा सर्वात मोठा घटक घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
प्रेमविवाह केल्याच्या अगदी काही महिन्यानंतर पती-पत्नींमध्ये वाद होतात. अशी अनेक जोडपी भरोसा सेलमध्ये समुपदेशनासाठी येतात. आम्ही त्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेत त्यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो.- सीमा सुर्वे, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.
प्रेमविवाहानंतर मोडलेले संसार
वर्ष व तक्रारी
२०१७ – ५२४
२०१८ – ५५३
२०१९ – ३८६
२०२० – ४५८
२०२१ – ६४१
२०२२ (मे) – ३०१