मुस्लिम व्यक्तीच्या अंत्ययात्रेला मार्ग मोकळा करून देण्यासाठी गणेश विसर्जनाची मिरवणूक काही काळ थांबविण्यात आल्याची घटना जातीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अचलपूर शहरात घडली. समाजात सध्या काही समाज विघातक घटकांकडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना अचलपूर शहराच्या हिंदू मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत मात्र ऐक्याचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला. हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या अचलपुरातील झेंडा चौक येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.बिलानपुरा अचलपूर येथील एका मुस्लिम व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याच दिवशी गणपती सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचा दिवस असल्याने अंत्ययात्रा कशी काढावी हा यक्षप्रश्न त्यांच्या कुटुंबातील लोकांना पडला. घरच्या नागरिकांनी याबाबत अचलपूर पोलिसांची संपर्क केला पोलिसांनी तत्काळ मृत्यू झालेल्या नागरिकांचे घर गाठले आणि नातेवाईकांसोबत चर्चा केली तसेच अंत्ययात्रेला पूर्ण संरक्षण देण्याची हमी दिली. 

हेही वाचा >>> अकोला : राहुल गांधींनीच काँग्रेस अध्यक्ष व्हावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा ; आ. नाना पटोले

याबाबत पोलिसांनी झेंडा चौक येथील गणपती मंडळाची सुद्धा संपर्क करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. अचलपुरातील झेंडा चौक हे अति संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो याच भागातून सार्वजनिक गणपती मंडळाची मिरवणुकीची वेळ झाली होती. अंत्ययात्रा बिलनपुरा येथे संध्याकाळी आली व तेथेच जनाजे नमाज करून मुस्लिम नागरिक कब्रस्थानकडे निघाले. अंत्य यात्रेच्या वेळी झेंडा चौक येथील हनुमान व्यायाम मंडळ व नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य यंत्रे ढोल ताशे लेझीम होते. अंत्ययात्रा येताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपले सर्व वाद्ययंत्रे व लेझीम बंद करून सर्व नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे राहून अंत्ययात्रेला मार्ग मोकळा करून दिला.

हेही वाचा >>> अमरावती : नवनीत राणांची दादागिरी चालणार नाही ; ॲड. असीम सरोदे

या घटनेनंतर मुस्लिम अमन ग्रुपच्या वतीने गणपती मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम हिंदू समाजातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी अचलपूरचे ठाणेदार माधवराव गरुड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. गणपती मंडळांनी केलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Story img Loader