नागपूर : हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होत आहेत. माणसांवर त्याचे परिणाम होत आहेच, पण आता प्राण्यांवर देखील हे परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या तापमानात स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी प्राण्यांचीही धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे, प्रौढ प्राण्यांपेक्षा या तरुण प्राण्यांना हवामान बदलाचा धोका अधिक असुरक्षित बनवत आहे. ही माहिती सिडनी येथील ‘न्यू साऊथ वेल्स’ विद्यापीठात झालेल्या अभ्यासातून समोर आली आहे.
या अभ्यासात ‘एक्टोथम्र्स’ किंवा थंड रक्ताच्या प्राण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पृथ्वीवरील ९९ टक्क्यांपेक्षा जास्त प्राण्यांचा समावेश यात करण्यात आला. मासे, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आणि कीटक यांचा समावेश आहे. या प्राण्यांच्या शरीराचे तापमान बाहेरील तापमानाला परावर्तित करते. त्यामुळे उष्णतेच्या लाटा आल्या की ते अधिक धोकादायकपणे गरम होऊ शकतात. तापमानाशी जुळवून घेण्याची प्रजातींची क्षमता महत्त्वाची असते. हवामान बदलामुळे एकूणच जैवविविधतेवर त्याचे नाटय़मय परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जागतिक तापमानवाढीला रोखण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जन तातडीने कमी करण्याची आणि उष्णतेच्या लाटेपासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी माणसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही या अभ्यासात म्हटले आहे.
प्रसंगी मृत्यू..
उष्णतेच्या लाटेदरम्यान प्राण्यांच्या शरीराचे तापमान इतके वाढते की त्यांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. ते चालण्याची किंवा पोहण्याची क्षमता प्राणी गमावू शकतात. प्रामुख्याने भ्रूण आणि तरुण प्राण्यांवर अधिक परिणाम होतो. तसेच पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांपेक्षाही जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांवरदेखील जास्त परिणाम होतो. उष्णतेशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली नसते. उच्च तापमानाच्या संपर्कात आलेला तरुण प्राणी भविष्यातील उच्च तापमानाचा सामना करण्यास सज्ज नसतात. तरुण व थंड रक्ताचे प्राणी वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहेत, असे देखील या अभ्यासात म्हटले आहे.