वाशीम : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मुख्य मागणीसाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर व इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. आज, १५ मार्च रोजी दुसऱ्या दिवशीही संप सुरूच असल्याने शासकीय कामे कोलमडली असून सर्वसामान्यांना संपाची झळ बसते आहे.
संपाचा प्रशासकीय सेवा, शिक्षण व आरोग्यसेवेला मोठा फटका बसत आहे. संपाचा सर्वाधिक प्रभाव आरोग्यसेवेवर झाला आहे. आरोग्यसेवा कोलमडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, शासन आणि जिल्हा परिषदांच्या पातळीवर मिळणाऱ्या सेवासुविधा ठप्प पडल्या असून जनतेचे हाल होत आहे.
हेही वाचा – धक्कादायक.. शवागरातील फ्रीझर बंद… दोन मृतदेहाचे काय झाले?
मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनांनी केला असल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारीच नसल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले असून, जनतेची कामे खोळंबली आहेत. कर्मचाऱ्यांअभावी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये ओस पडली आहेत.