अमरावती : पारशी नूतनवर्षाची आजपासून सुरूवात होत आहे. पारशी कुटुंबांची संख्या अमरावती जिल्ह्यात किंवा विदर्भात तशी नगण्यच असली तरी बडनेरा नव्यावस्तीत पारशी प्रार्थना स्थळ आहे. गेल्या १३५ वर्षांपासून ही ऐतिहासिक वास्तू समाज जीवनाची साक्षीदार बनली आहे. देश-विदेशातून पारशी बांधव या अग्यारीत दर्शनासाठी येत असतात. ही अग्यारी स्थापन झाल्यापासून येथे एक अखंड ज्योत तेवत आहे. पारशी लोक हे अग्निपूजक असून या ज्योतीसमोरच ते प्रार्थना करतात. या अग्यारीत पारशी धर्मीयांव्यतिरिक्त कोणालाही जाण्यास मनाई आहे. पण इतर धर्मीय अग्यारीच्या परिसरात जावून तेथील अवलोकन करु शकतात.
शंभर वर्षांपुर्वी बडनेरात कोळशाच्या रेल्वे इंजिन दुरुस्तीसाठी इंग्रजांनी लोकोशेड स्थापन केला होता. शेकडो रेल्वे कामगार आणि अधिकारी त्यानिमित्ताने बडनेरा शहरात वास्तव्यास आले होते. त्यात काही पारशी कुटुंबांचाही समावेश होता. त्याच काळात बडनेरात स्थापन झालेल्या विजय मिलमध्येसुद्धा कामाच्या निमित्ताने काही पारशी कुटुंब बडनेरात आली होती. जवळपास १५ पारशी कुटुंबांचे बडनेरात वास्तव्य होते, असे जुने जाणते लोक सांगतात. तत्कालीन बडनेरा नगर पालिकेचे पहिले नगराध्यक्ष जॉल भरूचा हे पारशी व्यक्ती होते. पारशी वर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ म्हणून ओळखला जातो. नवरोझच्या दिवशी पारशी लोक त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन तेथे प्रार्थना करतात. तसेच एकमेकांना गळाभेटी देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देतात. नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणींना भेटतात. या उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करण्याची देखील पारशी समाजात परंपरा आहे.