अमरावती : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा दुहेरी मार्ग यार्डच्या रिमॉडेलिंगसह दुरूस्तीच्या कामामुळे २२ व २३ मार्च रोजी मेगा ब्लॉक प्रस्तावित होता. तो रद्द करण्यात आला असून पुढील ब्लॉक हा २८ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाने कळवले आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचा मार्ग तर काहींच्या वेळात बदल करण्यात आला आहे.
अमरावतीकरांसाठी महत्त्वाची असलेली २७ मार्च रोजी नागपुरातून सुटणारी गाडी क्र. १२१३६ नागपूर-पुणे एक्सप्रेस, २८ रोजी पुण्याहून सुटणारी गाडी क्र. १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस, २६ रोजी नागपूरहून सुटणारी गाडी क्र. १२११४ नागपूर-पुणे व २७ रोजी पुण्याहून सुटणारी गाडी क्र. १२११३ पुणे-नागपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. यासोबतच २६ व २७ रोजीची कोल्हापूरहून सुटणारी गाडी क्र. ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस तसेच २८ व २९ रोजी गोंदियाहून सुटणारी गाडी क्र. ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> अनंतराव देशमुखांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससमोरील आव्हानात भर
हावडा-पुणे आझाद हिंद २५ व २६ रोजीची गाडी आणि हातिया-पुणे ही २६ रोजीची गाडी, या दोन्ही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या दोन्हीही गाड्या नागपूर-बल्लारशाह-सिकंदराबाद-वाडी-दौंड मार्गे पुण्यात पोहोचतील. तसेच सकाळी १०.४५ वाजता २६ रोजी पुण्याहून निघणारी गाडी क्र. २२८५४ पुणे-हतिया एक्सप्रेस दु. ३.२५ वाजता पुण्याहून निघेल. या सर्वच रेल्वे गाड्या अमरावती, बडनेरा येथील रहिवाशांसाठी महत्त्वाच्या असून याद्वारे मोठया संख्येत प्रवासी पुणे येथे जात असतात तसेच नागपुरात परत येत असतात. त्यामुळे २६ ते २८ मार्चपर्यंत पुन्हा अमरावतीकर प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.