लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: विविध आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांना ‘एलईडी’चा पिवळा प्रकाश पळवून लावत असल्याचे महत्वपूर्ण संशोधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एम.एस्सी. नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीयस्तरावरील पेटंट प्राप्त झाले आहे.

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजाराने सर्वांना त्रस्त केले आहे. डासांच्या संसर्गामुळे प्रत्येक परिवारात काही प्रमाणात त्याचे रुग्ण आढळतात. डासांपासून स्वतःचे रक्षण करण्याकरिता वेगवेगळे प्रकारचे उपाय सांगितले जातात व त्यानुसार प्रत्येक व्यक्ती ते करून बघतात. आज वनस्पतीपासून तर नवीन तंत्रज्ञानापर्यंतचा वापर करून देखील डासांपासून संरक्षण केले जाते. नॅनोसायन्स व टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी मुकेश तुरकाने, सिद्धेश्वर नागपुरे, प्रणाली झाडे व संशोधक विद्यार्थी डॉ. अभिजीत कदम यांच्या सोबत नॅनो टेक्नोमटेरियलवर आधारित एलईडीच्या प्रकाशित होणाऱ्या विभिन्न प्रकाशाच्या सहाय्याने हे संशोधन केले. यात पिवळ्या रंगापासून डास दूर राहतो असे आढळून आले.

आणखी वाचा-‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !

घरांमध्ये असा वापर करता येईल

घरामध्ये पिवळ्या रंगाचे विद्युत दिवे लावून त्यातून डासांना दूर ठेवता येईल असे त्यांनी सिद्ध केले आहे. घराच्या मुख्य दारासमोर व खिडकी समोर, बगीच्यात पिवळ्या रंगाचे विद्युत दिवे किंवा भिंती पिवळ्या रंगानी रंगवलेल्या असतील तर त्या ठिकाणी डास येणार नाही किंवा कमी येतील. घरातील व्यक्तींची डासांपासून सुटका होऊन ते मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया आदी आजारांपासून दूर राहील असे संशोधनातून म्हटले आहे.

आणख वाचा-फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे

संशोधनाला पेटंट मिळाले

डॉ. ढोबळे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाची आज आवश्यकता आह. या संशोधनावर कार्य करीत डॉ. ढोबळे यांनी आंतरराष्ट्रीय पेटंट प्रस्तुत केले होते. त्यांचे हे पेटंट मान्य झाले आहे. एमएस्सीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय पेटंट मान्य झाल्याबद्दल डॉ. ढोबळे यांनी स्वतः आनंदी होत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढे त्यांनी संशोधनाचा मार्ग निवडावा तसेच देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. उत्तम व समाजपयोगी संशोधन केल्याबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important research rashtrasant tukdoji maharaj nagpur university shows that mosquitoes are repelled by yellow light of led dag 87 mrj