नागपूर: नागपुरात एका डॉक्टरच्या मृत्यूनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांनाही त्यांचे आपत्य असलेल्या बहीण- भावाने चक्क बोगस दवाखाना टाकल्याचे पुढे आले होते. या घटनेत आता एक महत्वाची अपडेट पुढे येत आहे. या घटनेची गंभीर दखल खूद्द राज्यातील महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) घेतली आहे. परिषदेकडून एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे राज्यातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांकडून आरोग्य सेवा देतांना कायद्यासह नियमांचे पालन होते किंवा कसे हे पाहण्याची जबाबदारी असते. एमएमसीकडे ॲलोपॅथी डॉक्टरांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. दरम्यान एमएमसीकडे नागपुरातील अंसारनगरमधील डॉक्टरांच्या मृत्यूनंतर त्यांचे पाल्य असलेल्या बहीण- भाऊने चक्कम दवाखाना टाकून रुग्णसेवा देण्याचा प्रताप केल्याबाबतची तक्रार आली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल एमएमसीकडून घेतली गेली आहे. एमएमसीकडून नागपूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयासह गृहखात्याला पत्र पाठवून या प्रकरणाला गांभिर्याने घेत कुणी दोषी असल्यास त्यावर कडक कारवाईची विनंती केली जाणार आहे. ही कारवाई झाल्यास राज्यातील इतरही बोगस डॉक्टरांवर अंकुश बसण्याची आशा असल्याचेही एमएमसीकडून निवेदनात नमुद केले जाणार आहे.
प्रकरण काय ?
नागपुरातील अन्सारनगर परिसरात डॉ. साजिद अन्सारी दवाखाणा चालवत होते. त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा २३ वर्षीय जैद अन्सारी आणि बहीण समन अन्सारी हे नियम धाब्यावर बसवून कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना चक्क दोन पाळीमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. अवैध दवाखान्यामध्ये रक्तदाब मोजण्याची बीपी मशीनसह वैद्यकीय साहित्य ठेवले होते. सोबतच इंजेक्शन, औषधे, सलाईन देखील पोलीसांसह नागपूर महापालिकेच्या कारवाईसाठी केलेल्या चमूंना आथळली. नागपूर महापालिकेचा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासन म्हणतात…
राज्यातील काही भागात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा वारंवार तक्रारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे येत असतात. नागपुरात डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर चक्क त्यांचे पाल्य असलेल्या बहीण- भाऊने वैद्यकीय शिक्षण नसतांनाही रुग्णांवर उपचार करण्याबाबतचीही तक्रार एमएमसीकडे आली. त्यावर आम्ही नागपूर शहर पोलीसांसह गृहखात्याला या प्रकरणाची कसून चौकशी करून कुणी दोषी असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देणार आहोत, अशी माहिती लोकसत्ताशी बोलतांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासन डॉ. विंकी रुघवाणी यांनी दिली.