नागपूर: एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्पोर्ट को -ऑफ बँकेतील (एसटी बँक) पंढरपूर शाखेतील एका कर्मचाऱ्याला १.१० लाख रुपये लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले होते. या प्रकरणात महत्वाची अपडेट पुढे येत आहे. त्यानुसार या प्रकरणातील खऱ्या सूत्रधाराचा शोध घेतला तर घबाड बाहेर येईल, असा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी बँकेत होत असलेली बेकायदेशीर कर्मचारी भरती, संचालकांकडून होणारी उधळपट्टी व इतर सर्व कामकाजाबाबत सहकार आयुक्त व भारतीय रिझर्व्ह बँकेकडे अनेकांनी तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची चौकशी होऊन अहवाल बँकेच्या अध्यक्षांकडे पोहचल्यावरही कारवाई झाली नाही. परिणामी बँक आर्थिक अडचणींत सापडली असून सभासदांना या वर्षीचा लाभांश मिळाला नाही. वेळेवर कर्ज मिळण्यातही अडचणी येत आहे.

हेही वाचा – राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू

हेही वाचा – दृष्टिहीन ‘भूमिका’ची वाचनाप्रती डोळस भूमिका! सलग १२ तास ब्रेल लिपीतील…

दरम्यान आता बँकेत दररोज नवीन गैरप्रकार बघायला मिळत आहे. बँकेच्या पंढरपूर शाखेतील निलंबित कर्मचाऱ्याचा विभागीय चौकशी अहवाल वरिष्ठांकडे तातडीने पाठवण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या गेली. या प्रकरणात बँकेच्या कोल्हापूर शाखेचा निरीक्षक राहुल रमेश पुजारीला लाचलुचपत विभागाने शनिवारी रात्री पकडले. पोलिसांनी हा तपास पुढे चालू ठेवून बँकेत करण्यात आलेली बेकायदेशीर भरती, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्त्या, बढत्या या बाबतीत झालेला गैर व्यवहार यांचा शोध घेतला पाहिजे. या शिवाय बँकेच्या अनियमित कर्मचाऱ्यांवर अवाजवी लाखो रुपयांची खैरात केली जात आहे. नियम डावलून कर्मचारी भरती केली असून हंगामी कामगारांना ५० हजार रुपये बोनस दिला गेला आहे. जे कर्मचारी अधिकृत नाहीत. ज्यांच्या कामाचे स्वरूप तात्पुरते आहे. त्यांना बोनस दिला आहे. कुठल्याही संस्थेत बोनस वर्षभर काम केल्यानंतर दिला जातो, पण इथे मात्र ज्यांनी गेल्या आर्थिक वर्षात एक महिना काम केले आहे, अशा कर्मचाऱ्याना बोनस देण्यात आला आहे. या शिवाय बँक आर्थिक अडचणींत असताना ७५ हजार रुपये इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दिली असून त्यातही घोटाळा झाला आहे. याचा तपास पोलिसांनी करावा, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important update on st bank bribery case mnb 82 ssb